भिवंडीत मृत्यू वाढल्याने कब्रस्ताने अपुरी 

अधिक लोकसंख्या असलेल्या भिवंडी शहरात अजूनही दिवसाला जेमतेम ५० ते ७० करोना चाचण्या होत आहेत.

आशीष धनगर / जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : करोना चाचणी अहवालास होणाऱ्या विलंबामुळे निदानापूर्वीच होणारे मृत्यू आणि दररोज वाढणारा मृतांचा आकडा यामुळे भिवंडी शहर हादरले आहे. वाढत्या मृत्यूंमुळे कब्रस्तानांतील जागा अपुरी पडत असून कबर खोदण्यासाठी कामगार मिळणेही दुरापास्त झाले आहे.

करोना उद्रेकापूर्वी दररोज केवळ एक ते दोन मृतदेहांना दफन करणारे कर्मचारी सध्या दिवसाकाठी १२ ते १५ मृतदेहांसाठी कबरी खोदत आहेत. दररोज ८ ते १२ कबरी खोदून काही कब्रस्तानातील कामगार आजारी पडले आहेत, तर काहींनी संसर्गाच्या भीतीने काम सोडले आहे. परिणामी, मृतांना दफन करण्यासाठी जागा आणि कबरी खोदण्यासाठी कामगार शोधताना यंत्रणा हतबल झाली आहे. या गोंधळात करोनाव्यतिरिक्त शहरात किती मृत्यू झाले याची आकडेवारीही महापालिकेकडे उपलब्ध नाही.

करोना फैलावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भिवंडीत आठ दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता. मुंब्रा, मालेगावसारख्या मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये रुग्णांचा आकडा वाढत असताना भिवंडीत रुग्ण नाहीत असे म्हणत स्थानिक यंत्रणा पाठ थोपटून घेत होत्या. हे असे का झाले असावे यामागील कारण आता पुढे येऊ लागले आहे.

दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भिवंडी शहरात अजूनही दिवसाला जेमतेम ५० ते ७० करोना चाचण्या होत आहेत. मुंबई-ठाण्यासारख्या शहरात करोना रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत अशा तक्रारी असताना भिवंडीत चाचण्यांसाठी आरक्षण करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. या चाचण्यांचा अहवाल येण्यास ३ ते ४ दिवस लागत आहेत. अहवाल येईपर्यंत अनेक रुग्णांना उपचारांपूर्वीच प्राणास मुकावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. येथील करोना मृतांचा आकडा खूप मोठा असण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

स्थिती काय?

भिवंडी शहरात बुधवारी २१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. गुरुवारी सायंकाळपर्यंत शहरातील करोना रुग्णांची संख्या ७२७ झाली होती, तर मृतांचा आकडा ५८ वर पोहोचला होता. या शासकीय आकडय़ांमधील फोलपणा कब्रस्तानांमधील चित्र पाहून सहज लक्षात येतो. भिवंडी शहरात २१ कब्रस्ताने आहेत. मृत्यू वाढत असल्यामुळे कामाचा ताण सध्या प्रचंड असल्याचे भिवंडीच्या कब्रस्तानातील कर्मचारी समीर अन्सारी यांनी सांगितले.

भीतीने कामगारांचा पळ

दोन महिन्यांपूर्वी कबर खोदण्यासाठी दिवसा दोन आणि रात्री दोन असे चार कामगार होते. आता एक कामगार मिळणे कठीण झाले आहे. काहींनी संसर्गाच्या भीतीने काम सोडले आहे, तर काही आजारी पडले आहेत, अशी माहिती गय बन शहा कब्रस्तानचे अक्रम अन्सारी यांनी दिली. मृतांना दफन करण्यासाठी प्रत्येक कब्रस्तानात २४ कामागारांची नेमणूक केली गेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मृताचा आजार नोंदवण्याच्या सूचना  

शहरात मृतांच्या संख्येमध्ये १ जूनपासून झपाटय़ाने वाढ झाली असून चाचण्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याने मृत व्यक्ती करोनाचा रुग्ण आहे की नाही हे समजणे कठीण होते. त्यामुळे कब्रस्तान संस्थाचालकांनी खबरदारी घेऊन आणि दफनविधीसाठी येणाऱ्या प्रत्येक मृताच्या आजाराचा तपशील नोंदवण्याच्या सूचना ठाणे पोलिसांनी दिल्या आहेत. विनापरवाना दफन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

क्षमता संपली..

’येथील कब्रस्तानात महिन्याला २८ ते ३० मृतांना दफन करण्याची क्षमता आहे.

’१ जूनपासून आत्तापर्यंत शहरातील गैबीपीर कब्रस्तानात ६८, गय बन शहा कब्रस्तानात ५३ आणि रेहमतपुरा कब्रस्तानात ५० रुग्णांना दफन करण्यात आल्याची माहिती भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक फराज बहुउद्दीन यांनी दिली.

’शहरातील इतर १८ कब्रस्तानांचीही अशीच अवस्था आहे. त्यामुळे काही कब्रस्तानांबाहेर क्षमता संपल्याचे फलक लावण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

’मृत व्यक्ती करोनाबाधित आहेत का, या प्रश्नावर कर्मचारी मौन धारण करतात. त्यांचे मौन बरेच काही सांगून जाते.

’मृतांची आकडेवारी किती अशी विचारणा महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे केली असता तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No place for burial in bhiwandi kabristan due to increase in deaths zws

ताज्या बातम्या