‘लस नाही तर पगार नाही’, ठाणे महापालिकेनं कर्मचाऱ्यांना सोडलं फर्मान!

अजूनही लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ठाणे महानगर पालिकेनं सज्जड दम दिला असून लसीकरण करण्याची सक्ती केली आहे.

vaccine
लसीकरण (प्रातिनिधिक छायाचित्र)

सध्या देशभरात व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील लसीकरणाने वेग पकडला असून नव्या करोनाबाधितांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. बऱ्याच प्रमाणात राज्य सरकारकडून निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, याचा विपरीत परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यातच आता ठाणे महानगर पालिकेकडून कर्मचाऱ्यांसाठी नवे आदेश जारी करण्यात आले असून ज्या कर्मचाऱ्यांनी पात्र असून देखील लस घेतलेली नाही, त्यांचा पगार थांबवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.

ठाणे महानगर पालिकेमध्ये सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ठाण्याचे आयुक्त विपिन शर्मा आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असून त्यातील निर्णयाचं निवेदन सोमवारी रात्री उशिरा काढण्यात आलं. यानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी अजून त्यांचा करोना लसीचा पहिला डोस देखील घेतलेला नाही त्यांचा पगार थांबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे मात्र दुसऱ्या डोसची मुदत उलटून देखील दुसरा डोस घेतलेला नाही, अशा कर्मचाऱ्यांचा पगार देखील थांबवण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागांमध्ये लसीकरणाचं प्रमाणपत्र जमा करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. या महिनाअखेरीपर्यंत शहरा १०० टक्के लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी ही पावलं उचलण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No vaccine no salary thane municipal corporation orders workers pmw

ताज्या बातम्या