scorecardresearch

ठाणे शहराच्या काही भागात बुधवारी पाणी नाही

चोवीस तासांच्या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून स्टेम प्राधिकरणामार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन करण्यात आले आहे.

water cut

पिसे टेमघर जलशुद्धिकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच १५०० मिमी वॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.

कल्याण- पडघा रस्त्याच्या बाजुला सावधनाका येथे ठाणे महापालिकेच्या पिसे टेमघर जलशुद्धिकरण केंद्राला जाणाऱ्या अशुद्ध मुख्य जलवाहिनीतुन पाणी गळती होत आहे. या गळतीमुळे मोठया प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून त्याचबरोबर कल्याण-पडघा रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. ही गळती थांबविण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्ती काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बृहन्मुंबई महापालिकेच्या पिसे येथील वसाहतीमध्ये १५०० मिमी वॉल्व बसविण्यात येणार आहे.

या कामामुळे बुधवार, २३ मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ९ या वेळेत ठाणे शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. चोवीस तासांच्या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून स्टेम प्राधिकरणामार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन करण्यात आले आहे.

त्यानुसार बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समता नगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, तसेच आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ या वेळेत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No water in some parts of thane city on wednesday abn

ताज्या बातम्या