लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या वाहिन्या कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.




ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून हा स्त्रोत महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन वाहीन्या टाकल्या असून त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
आणखी वाचा- डोंबिवलीतील मनसे कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, ठाकरे समर्थक स्तब्ध
हे काम शुक्रवार, २४ मार्च रोजी दुपारी १२ ते शनिवारी, २५ मार्च रोजी दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार असून या कालावधीत ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दिवा, कळवा, मुंब्रा येथील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसर, वागळे इस्टेट परिसरातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक- २, नेहरुनगर तसेच मानपाडा भागातील कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.