ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा मंगळवार ते गुरुवारदरम्यान बंद राहणार असून त्यामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ३ फेब्रुवारी ते गुरुवार ५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे. या कालावधीत वागळे इस्टेट परिसरातील किसननगर नं. १, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, काजूवाडी, रामचंद्रनगर, पडवळनगर, अंबिकानगर, नामदेववाडी, शिवाईनगर, म्हाडा कॉलनी या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
बुधवारीही पाणी नाही
उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठय़ाच्या नियोजनानुसार कळवा लघु पाटबंधारे विभागाने १४% पाणी कपात करण्याचे आदेश दिल्याने स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद राहणार आहे.
त्यामुळे बुधवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० पर्यंत शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
 या कालावधीत घोडबंदर रोड परिसर, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, घोडबंदर रोड, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या पाणीबंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.