या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरवणुकांच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त; पोलिसांचेही दणदणाटाकडे दुर्लक्ष

चिंचोळे रस्ते, दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती यांमुळे आधीच गजबजलेला लोकमान्यनगर, यशोधननगर परिसर सध्या गोंगाटाचा बनला आहे. ध्वनिप्रदूषणासंबंधीच्या नियमांना धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत चालणारा डीजेचा दणदणाट, चिंचोळ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीत पोलिसांना वाकुल्या दाखवत काढल्या जाणाऱ्या पालखी सोहळ्यांच्या मिरवणुका आणि त्यासाठी वेळ तसेच शांतता क्षेत्राचे कोणतेही भान न राखता घातला जाणारा गोंधळ यामुळे या परिसरातील रहिवाशांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. विशेष म्हणजे, शहरातील एका मोठय़ा भागात अव्याहतपणे सुरू असणाऱ्या या दणदणाटाकडे पोलीस यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

लोकमान्यनगर, यशोधननगर हा भाग मुख्य शहरापासून लांब पल्ल्यावर आहे. चिंचोळे रस्ते आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या गर्दीमुळे वाहतुकीसाठी रस्ता अरुंद आहे. या अरुंद रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. निवडणूकपूर्व काळात रहिवाशांच्या मागण्यांवरून या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. निवडणुका संपताच या भागातील स्थिती पुन्हा तशीचआहे. या भागात भाज्या तुलनेने स्वस्त मिळत असल्याने बाजारहाट करण्यासाठी रहिवाशांचा मोठा राबता या भागात असतो. त्यामुळे येथे फेरीवाले उदंड झाले आहेत. भाजी विकण्यासाठी फेरीवाल्यांची गर्दी आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या अशा गर्दीत लग्नाची वरात, पालखी सोहळ्यांच्या मिरवणुकांना सध्या पेव फुटले आहे. काही दिवसांपासून या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या रहिवाशांनी उच्छाद मांडला आहे. मोठय़ा आवाजातील मिरवणुका काढल्या जात आहेत. याच परिसरात रुग्णालये असल्याने काही भाग शांतता क्षेत्रात येतो. तरीही मोठय़ा आवाजात मिरवणुका काढल्या जात आहेत. अत्यंत अरुंद रस्ते आणि त्यावरून मिरवणुका जात असल्याने वाहतूक कोंडी होते. वाहनचालक मोठय़ा आवाजात हॉर्न वाजवत असल्याने हा परिसर गोंगाटाचा बनला आहे. लग्नसमारंभ असल्यास रात्रीचे नियम पाळले जात नाहीत.

परीक्षार्थी त्रस्त, वृद्ध हतबल

ऐन परीक्षांचा काळ असल्याने मोठय़ा आवाजातील मिरवणुकींमुळे या भागातील इमारतींमध्ये राहणारे विद्यार्थी त्रस्त आहेत. सायंकाळच्या वेळी अभ्यास करायला घेतल्यावर मिरवणुका या भागातून जात असल्याने अभ्यासात व्यत्यय येतो. वृद्धांनाही या मोठय़ा आवाजाचा त्रास होत असतो. मिरवणुकीत प्रचंड आवाज असल्यास पोलीस यंत्रणेला कळवल्यास पोलीस येऊन गेल्यावर तात्पुरता आवाज बंद होतो, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच परिस्थिती असल्याचे यशोधननगरमध्ये राहणाऱ्या अजिंक्य शिंदे या विद्यार्थ्यांने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise pollution issue in lokmanya nagar
First published on: 20-04-2017 at 01:34 IST