नियमांची मुस्कटदाबी करून आवाज टिपेला
न्यायालयाचे र्निबध, महापालिकेची आचारसंहिता आणि बडय़ा आयोजकांनी घेतलेली माघार यांमुळे दहीहंडी उत्सव शांततेत पार पडण्याची ठाणेकरांची आशा रविवारी दणदणाटाने फोल ठरवली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ध्वनिप्रदूषणाने मर्यादेची पातळी ओलांडल्याचे रविवारी दिसून आले. ठाण्यातील जांभळीनाका येथे सायंकाळी ७ वाजता सर्वाधिक आवाजाची पातळी नोंदवण्यात आली असून ती सुमारे ८५ ते ९० डेसिबलपर्यंत होती. त्याखालोखाल टेंभीनाका परिसरात दुपारी २ आणि सायंकाळी ७.३० वाजता ८०-८५ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. मात्र, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण काहीसे घटल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी समाधान व्यक्त केले.
दहीहंडी उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण मर्यादेबाहेर जाऊ नये, यासाठी न्यायालयाने आखून दिलेले र्निबध रविवारी सर्रास पायदळी तुडवले गेले. डॉ. महेश बेडेकर यांनी रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या पातळीची मोजणी केली असता, आयोजकांनी नेहमीप्रमाणे यंदाही नियमांची मुस्कटदाबी केल्याचे स्पष्ट झाले. जांभळी नाक्यावर दुपारी आवाजाची मर्यादा ८० तर रात्री ९० डेसिबलपर्यंत पोहोचली होती.
उत्सवामुळे वाहतुकीवर झालेल्या परिणामांचाही डॉ. बेडेकर यांनी अंदाज घेतला. जांभळी नाका येथे दहीहंडीमुळे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तर टेंभी नाका परिसरात जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीने अध्र्याहून अधिक रस्ता अडवला होता.

डोंबिवली, अंबरनाथमध्ये गुन्हे..
रस्त्यावर मंडप उभारून सण-उत्सव साजरे करू नका, असे उच्च न्यायालयाचे आदेश असूनही डोंबिवली-अंबरनाथमध्ये दहीदंडी उत्सव अनेक ठिकाणी रस्त्यावर मंडप उभारून हे सण साजरे केले गेले. डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. पोलिसांची परवानगी नसताना मंडप बांधणे, ध्वनिक्षेपक लावून उत्सव साजरा केल्याप्रकरणी आयोजकांवर विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ येथील मटका चौक परिसरातील दहीहंडीसाठी पोलिसांनी परवानगी नाकारूनही त्यांची नोटीस धुडकावून आयोजकांनी उत्सव साजरा केला. त्यामुळे या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोखले रस्त्यावर सामसूम..
ठाण्यातील मध्यवर्ती रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोखले रस्त्यावर मात्र, रविवारी शांतता होती. या रस्त्यावर आठ ते दहा रुग्णालये आहेत. या भागात दरवर्षी पाच ठिकाणी दहीहंडी आयोजित केल्या जात असत. त्यामुळे ध्वनिप्रदूषण मर्यादेपलीकडे होत होते. मात्र यंदाच्या वर्षी अनेक आयोजकांनी माघार घेतल्याने गोखले रोड परिसरातील गोंधळ शांत झाला होता. एकूण मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा शहरातील ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे सामाजिक संस्थांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.