ठाणे : सर्वसामान्य व्यक्ती तक्रारी करण्यास घाबरतात. त्यांच्यामध्ये दहशत निर्माण होत असेत. परंतु ध्वनीप्रदूषण किंवा इतर मुद्द्यांवर जोपर्यंत आवाज उठवित नाही. तोपर्यंत ते विषय सुटणार नाही. नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठविल्यानंतर राजकीय पक्षाचे नेते देखील त्यांची भूमिका बदलतात. हे विषय चर्चेत राहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येणे आवश्यक आहे असे सामाजिक कार्यकर्ते डाॅ. महेश बेडेकर म्हणाले.

अनधिकृत मंडप आणि ध्वनी प्रदूषण या विषयावर विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयात बुधवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव रवींद्र पाजनकर, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. महेश बेडेकर, ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक द्वारका ढोके, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात पाजनकर यांनी संविधानाने नागरिकांना दिलेल्या विविध मूलभूत अधिकारांचा उल्लेख करत ‘शांततेचा अधिकार’ या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य केले. स्वतःला वाटणारा आनंद जेव्हा दुसऱ्याच्या शांततेचा भंग करतो, तेव्हा आपला आनंद कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही, हे समजून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

या डॉ. महेश बेडेकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्देशांवर चर्चा करण्यात आली. डॉ. महेश बेडेकर यांनी जनहित याचिका दाखल करण्यामागील कारणे तसेच तिचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. ‘डीजे किंवा ध्वनीक्षेपकाला विरोध करणे अथवा सार्वजनिक रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने मंडप उभारण्यास विरोध केला की, त्याचे उत्तर देण्याऐवजी काही जण असंबंधित मुद्दे उपस्थित करून वितर्क मांडतात. मी उत्सवप्रिय व्यक्ती आहे; मात्र माझ्या उत्सवामुळे इतरांना त्रास होऊ नये, ही माझी जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जनहित याचिकेतून समोर आलेले न्यायालयीन निर्देश कठोरपणे अंमलात आणले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यंदा दहीहंडीत संस्कृतीच्या नावाखाली जे झाले ते कोणालाही पटणारे नाही असेही ते म्हणाले.

ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक द्वारका ढोके यांनी पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असतात. मात्र, एकाच विषयावर दोन गटांच्या परस्परविरोधी भूमिका असतील, तर कायद्यानुसार निर्णय घ्यावा लागतो, असे सांगितले. नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण होणे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी आपत्ती उद्भवू नये यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजना तसेच आपत्ती उद्भवल्यास करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. जनहित याचिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेला देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करून उत्सव शांततापूर्ण पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.