दहा नगरसेवकांवर टांगती तलवार
कल्याण डोंबिवली पालिकेतील चार नगरसेवकांना बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्याप्रकरणी प्रशासनाने नगरसेवक पद रद्द करण्याच्या नोटिसा शुक्रवारी बजावल्या आहे. यामध्ये शिवसेनेचे तीन व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. शिवसेनेचे वजनदार नगरसेवक मल्लेश शेट्टी यांना काल पद रद्द करण्याची नोटीस पाठविल्यानंतर आज प्रशासनाने उर्वरित चार नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या. सर्व पक्षांमधील एकूण दहा नगरसेवकांचा पद रद्द करण्याच्या यादीत समावेश आहे.
काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे, शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे, नगरसेविका कविता म्हात्रे, अपक्ष शिवसेना समर्थक नगरसेवक विद्याधर भोईर यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी नगरसेवक पद रद्द करण्याच्या नोटिसा पाठविल्या. या नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये बेकायदा बांधकाम केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. प्रभाग अधिकाऱ्यांनी या नगरसेवकांच्या कृत्याची माहिती आयुक्तांना दिली. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आयुक्त रवींद्रन यांनी चार नगरसेवकांना पद रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नगरसेवकांनी तीन दिवसांच्या आत आपला खुलासा प्रशासनाला करायचा आहे.
पोटे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका बांधकाम प्रकरणात यापूर्वी दिले आहेत. भोईर हे अनधिकृत बांधकामप्रकरणी लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ पकडले होते. काही दिवस ते पोलीस कोठडीत होते. पालिकेत शिवसेनेची सत्ता असल्याने त्यांची तत्कालीन आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून पाठराखण केली होती. वामन म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकामाशी आपला संबंध नाही. पत्नी शंकुतला म्हात्रे यांच्या नावाने विजय भोईर यांच्याकडून संबंधित मालमत्ता विकत घेतली आहे, असा खुलासा प्रशासनाला गेल्या वर्षी केला आहे.

पहिल्यांदाच कारवाई
काँग्रेसचे नगरसेवक नवीन सिंग, बुधाराम सरनोबत, मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांचा बेकायदा बांधकामांशी संबंध आहे का, यासंबंधीच्या कागदपत्रांची प्रशासन छाननी करीत आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. आयुक्त ई. रवींद्रन यांच्या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या पंधरा वर्षांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नगरसेवकांची बेकायदा बांधकामांवरून नगरसेवक पद रद्द करण्याची ही पहिलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे.