कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता कल्याण पूर्व विजयनगर भागातील सेंट थाॅमस शाळेने शाळेेच्या प्रवेशव्दारावरील बदामाचे जुनाट झाड तोडले. या नियमबाह्य कृतीबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाने शाळा व्यवस्थापनाला कारवाईची नोटीस पाठवून सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी पालिका प्रशासनाचे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उपक्रम सुरू आहेत. शहर, परिसरात हरितपट्टे विकसित करण्यासाठी पालिका प्रशासना बरोबर, सामाजिक, पर्यावरण संवर्धन संस्थांनी पुढाकार घ्यावा म्हणून आयुक्त डाॅ. जाखड प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत कल्याणमधील एका शिक्षण संस्थेने पालिकेच्या परवानग्या न घेता झाड तोडल्याबद्दल आयुक्तांंनी तीव्र नाराजी व्यक्त करून याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत.

हेही वाचा >>>कल्याण-शिळफाटा रस्त्याला वाहनकोंडीचा विळखा, दोन्ही मार्गिकांमधून एकाच दिशेने वाहने सोडण्याचा प्रकार

सेंट थाॅमस शाळेला शाळेच्या प्रवेशव्दारावर एक प्रवेशव्दार उभारायचे आहे. या कामासाठी शाळेच्या प्रवेशवद्रारावरील बदामाचे २५ वर्ष जुने २५ फूट उंचीचे बदामाचे झाड अडथळा येत होते. हा अडथळा हटविण्यासाठी हे झाड धोकादायक नसताना ते तोडल्याने नागरिक, पालक नाराज झाले होते. उन्हाळ्यात शाळेच्या प्रवेशव्दारावर सावलीसाठी हे झाड मोठा दिलासा होते, असे पालक सांगतात.

याप्रकरणी या भागातील काही जागरूक नागरिकांनी हा विषय पालिका आयुक्त, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या निदर्शनास आणला. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सेंट थाॅमस शाळा प्रशासनाला महाराष्ट्र क्षेत्र झाडांच जतन व संरक्षण अधिनियमान्वये नोटीस पाठवली. आणि सात दिवसात याप्रकरणी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विहित वेळेत शाळेने खुलासा केला नाहीतर या कलामन्वये शाळेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत दिला आहे.

हेही वाचा >>>बदलापूरच्या उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, किरकोळ पावसातच खड्डे पडल्याने वाहनचालकांची कसरत

दोन दिवसापूर्वी ठाणे पालिका हद्दीतील देसई-तांबडीपाडा गावातील एका रहिवाशावर घरासमोरील कडुनिंबाचे झाड तोडले म्हणून पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारची कारवाई सेंट थाॅमससह बेकायदा झाडे तोडणाऱ्यांंवर करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

प्राप्त माहितीप्रमाणे सेंट थाॅमस शाळेला नोटीस पाठवली आहे. शाळेचा खुलासा आल्यानंतर कारवाईबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.-संजय जाधव,मुख्य उद्यान अधीक्षक,कडोंमपा.