कल्याण – नोकरीनिमित्त लंडनमध्ये स्थायिक असलेल्या कल्याणमधील महाजनवाडी भागातील एका मूळ निवासी नोकरदार महिलेची एका अज्ञाताने शेअर गुंतवणुकीत वाढीव परतावा देतो असे अमिष दाखवून ५१ लाख ५६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी या महिलेच्या नातेवाईक आणि फसवणूक झालेल्या महिलेने कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलीस ठाण्यातील माहिती, अशी की कल्याणमधील महाजनवाडी भागातील एक कुटुंब लंडन येथे पर्यटन व्यवसाय आणि नोकरीनिमित्त राहते. फसवणूक झालेली महिला एका औषध कंपनीत नोकरी करतात. दोन महिन्यापूर्वी लंडनमधील घरी असताना त्यांना फेसबुकच्या माध्यमातून शेअर व्यवहार शिक्षण मार्गदर्शन घेऊ शकता का, अशी जाहिरात पाहिली. या जाहिरातीची जुळणी उघडताच तक्रारदार महिलेचा मोबाईल क्रमांक एका व्हाॅटसपक्रमांकाशी जोडण्यात आला. त्यानंतर त्यांना शेअर गुंतवणुकीतून झटपट कमी कालावधीत वाढीव नफा कसा मिळू शकतो, अशा प्रकारची ऑनलाईन माध्यमातून माहिती देण्यात आली. तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना शेअर गुंतवणुकीसाठी विविध प्रकारच्या जुळण्या अज्ञाताकडून पाठविण्यात आल्या.
शेअर गुंतवणुकीचे मुख्य कार्यालय अमेरिकेत आहेत. अलीकडेच मुंबईत शाखा उघडण्यात आली आहे. आपण आपले बँक खाते उघडण्यासाठी आपण भारत देशाची निवड करा, असे फसवणूक झालेल्या महिलेला अज्ञाताकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीप्रमाणे महिलेने आपली व्यक्तिगत, बँक खातेविषयक माहिती अज्ञातांनी पाठविलेल्या जुळणी आणि ऑनलाईन माध्यमातून संबंधितांना दिली. शेअर गुंतवणुकीसाठी अज्ञातांनी महिलेकडून सुमारे ३० हून अधिक बँक व्यवहारातून ५१ लाख ५६ हजार रूपये संबंधितांनी दिलेल्या बँक खात्यावर भरणा केले.
गुंतवणूक केलेल्या रकमेवर आपणास मोठा परतावा मिळणार असल्याचे उपयोजनच्या माध्यमातून तक्रारदार महिलेला दिसत होते. ती वाढीव रक्कम काढण्याचा प्रयत्न महिलेने केला. पण त्यासाठी वाढीव रक्कम भरणा करावी लागेल अशी अट टाकण्यात आली. या सगळ्या प्रकारातून आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. आपल्या नातेवाईकाच्या माध्यमातून आणि स्वता फसवणूक झालेल्या महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.