|| आकांक्षा मोहिते, नीरज राऊत

सुक्या मेव्याखेरीज फळबियांपासून बनवलेल्या मिठाईंना मागणी; दरांमध्ये ५० रुपयांपर्यंत वाढ

ठाणे/ पालघर : करोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे दिवाळी जल्लोषात साजरी करण्याचे वेध लागले असले तरी करोनाकाळात शारीरिक स्वास्थ्य योग्य राहण्यासाठी पौष्टिक आणि आरोग्यवर्धक पदार्थांकडे नागरिकांचा वाढलेला कल मिठाई बाजारात टिकून आहे. केवळ तोंड गोड करण्याकरिता मिठाई खरेदी करण्याऐवजी काजू, बदाम अशा सुक्या मेव्यापासून बनवलेल्या मिठायांसोबतच विविध फळांच्या बियांपासून बनवलेल्या मिठायांना यंदा बाजारात जास्त मागणी आहे. दुसरीकडे, दूध, तूप आणि अन्य आवश्यक जिनसांच्या दरांत वाढ झाल्याने मिठायांच्या दरांतही सरासरी किलोमागे ४० ते ५० रुपयांची वाढ झाल्याचेही दिसून येत आहे.

 दरवर्षी दिवाळी सणानिमित्त आप्तेष्टांना तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी बाजारात मिठाईंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागील वर्षी करोना प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. तर कार्यालयीन कामकाजही घरातून सुरू होते. त्यामुळे मागील वर्षी दिवाळीत मिठाईच्या मागणीत घट झाली होती. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी या आजाराचे सावट कायम आहे. त्यामुळे नागरिकांचा ओढा आरोग्याच्या   दृष्टीने हितकारक अशा मिठायांच्या खरेदीकडे वाढू लागला आहे. सुक्या मेव्यापासून बनवलेल्या अस्सल मिठाईखेरीज गुलाब, आंबा, केसर, संत्री यांपासून बनवलेल्या मिठायांची सध्या रेलचेल आहे. 

आंबा, केसर, पानमसाला, गुलाब, संत्री, ओरियो अशा विविध प्रकारांमधील मिठाई १ हजार २८० रुपये प्रति किलो विकली जात आहे. कलिंगड, टरबूज, सूर्यफूल आदींच्या बियांपासून तसेच किवी, अंजिर, क्रॅनबेरी, खजूर यांपासून तयार केलेले लाडू दीड हजार रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहेत. गूळ, गुलाब, केसर, जेली, संत्री, स्ट्रॉबेरी, लिची यांपासून तयार करण्यात आलेले काजूकतलीचे प्रकार १ हजार २८० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. यंदा सुक्या मेव्यापासून बनवलेल्या ड्रायफ्रूट करंजींनाही जास्त मागणी असून ८०० रुपये किलो दराने ती विकली जात आहे.

चॉकलेटनाही चांगली मागणी

यंदा ड्रायफ्रूट तसेच ओरियाच्या मिश्रणातून तयार केलेले विविध चॉकलेट लक्ष वेधून घेत आहेत. खास लहान मुलांसाठी जेम्स चॉकोबाइट हा मिठाईचा नवा प्रकार १ हजार ८० रुपये किलोने बाजारात उपलब्ध आहे. तर दिवाळी पाडवा, भाऊबीज यानिमित्त भेट देण्यासाठी बाजारात ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स यांचे वेगवेगळ्या आकर्षक परडी स्वरूपात गिफ्ट्स उपलब्ध आहेत. तसेच क्रंच कॉम्बो, फराळ हे नवे प्रकार बाजारात उपलब्ध असून ५०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत हे आकर्षक गिफ्ट हँपरर्स बाजारात विक्री करण्यात येत आहेत.

मागणीत ९० टक्के अधिक

दरवर्षी दिवाळी सणानिमित्त प्रामुख्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मिठाई भेटवस्तू देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र कार्यालये बंद असल्यामुळे मिठाईच्या मागणीत ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली होती. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सर्व कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना मिठाई देण्यासाठी आगाऊ  नोंदणी केल्या आहेत. यामुळे यंदाच्या वर्षी मिठाईंच्या मागणीत ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दूध, तुपाच्या दरवाढीमुळे महाग

गतवर्षीच्या तुलनेत दुधाचे दर १२ रुपये प्रति लिटरने वाढल्यामुळे मिठाई दरात थेट ३० ते ४० रुपये प्रति किलो इतकी दरवाढ झाली आहे. शिवाय देशी तुपाचे दर दुप्पट झाले असून काजूच्या दरांमध्येदेखील शंभर-सव्वाशे रुपयांची वाढ झाली आहे. हे पाहता सर्वसाधारणपणे मिठाईचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येते. ‘पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर तसेच दुधाचे आणि सुक्या मेव्याच्या वाढत्या दरामुळे यंदा मिठाईच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे,’ अशी माहिती टीप-टॉप दुकानाचे मिठाई विक्रेते देवाशीष दास यांनी दिली.