बदलापूर : कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका प्रशासनांनी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्यात आल्या. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या रचनेवर ११३ तर अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर ६४ हरकतींची नोंद झाली आहे. या हरकतींवर येतया १९ किंवा २० मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरांतील हरकतीमध्ये प्रभागाच्या सीमांबाबत आक्षेप असल्याची माहिती मिळते आहे.
कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांची मुदत २०२० या वर्षांत संपली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांना निवडणुकांची प्रतीक्षा आहे. दोन्ही शहरांमध्ये २०१९ वर्षांच्या अखेरीस प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र कालांतराने राज्य शासनाने एकसदस्यीय प्रभाग पद्धती बदलून द्विसदस्यीय प्रभाग पद्धती अमलात आणली. त्यामुळे दोन्ही शहरांतील प्रभागांची पुनर्रचना करण्याची वेळ आली. त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. १० मार्च रोजी दोन्ही नगरपालिकांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्या. या प्रभाग रचनेनंतर सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी नुकत्याच दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका प्रशासनांना सूचना दिल्या. त्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या मुंबई महानगर क्षेत्रातील अ वर्ग नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० मे ते १४ मे या काळात सूचना आणि हकरती मागवण्यात आल्या होत्या. १४ मे रोजी मुदत संपेपर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडे प्रारूप प्रभाग रचनेवर ११३ तर अंबरनाथ नगरपालिकेकडे ६४ सूचना आणि हरकती प्राप्त झाल्याची माहिती दोन्ही पालिका प्रशासनांनी दिली आहे.
नियमांना बगल
प्रारूप प्रभाग रचना करत असताना निवडणूक आयोगांच्या मार्गदर्शन तत्त्वांकडे काणाडोळा करण्यात आला. तसेच नियमांना बगल देत काही नगरसेवकांच्या विद्यमान प्रभागात इतर भाग जोडून आरक्षण बदलाचा घाट काही अधिकाऱ्यांनी घातल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक अविनाश भोपी आणि सूरज मुठे यांनी केला आहे. याबाबत लेखी हरकतीही नोंदवल्या असल्याचे भोपी यांनी सांगितले आहे.
यापूर्वीही अनेक आरोप
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच ती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे सांगत एका बडय़ा शिवसेना नेत्यासोबत रेसॉर्टवर ही रचना केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशीष दामले यांनी केला होता. ती यादीही त्यांनी जाहीर केली होती. तीच रचना प्रारूप नावाने प्रसिद्ध केल्याचाही दावा दामले यांनी पुढे केला होता. त्यामुळे ही रचना वादात सापडली होती.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला प्राप्त झालेल्या ११३ सूचना आणि हकरतींमध्ये प्रभागांच्या सीमांबाबत घेतल्या गेलेल्या आक्षेपांची संख्या अधिक आहे. २० मेला त्यावर सुनावणी घेतल्या जातील. – योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.