ठाणेः ॲप आधारित टॅक्सी सेवांमधील चालकांकडून आयत्या वेळी केली जाणारी अतिरिक्त पैशांची मागणी आणि नकार दिल्यास प्रवास सेवा रद्द करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड तर बसतोच आहे पण अनेकदा प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते आहे. या चालकांच्या मनमानीविरूद्ध आता लोकप्रतिनिधींनीही आक्षेप घेण्यास सुरूवात केली आहे. अशाच काही प्रकरणांविरूद्ध कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परिवहन मंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावर लवकरच धोरण आणू असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षात ॲप आधारित रिक्षा, टॅंक्सी सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. स्थानिक रिक्षा थांबे, खासगी चालकांच्या मनमानी भाडे आकारणी आणि आडमुठे धोरणामुळे प्रवाशांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. अल्पावधितच अनेक कंपन्यांनी या सेवा देण्यास सुरूवात केली. मात्र गेल्या काही वर्षात कंपन्यांकडून दिला जाणारी सुट आणि त्यामुळे वाहनचालकांची कोंडी पाहता तसेच अतिरिक्त पैशांची लालसा पाहता वाहनचालक थेट प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे टीपच्या स्वरूपात उकळू लागले आहेत. असे अनेक प्रकार आता समोर येत आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरांतील प्रवासी या प्रकारामुळे सध्या प्रचंड त्रासले आहेत. प्रवाशाने ॲपवर प्रवासासाठी वाहन नोंद केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वाहन आलेले असतानाच, चालकांकडून १०० ते १५० रुपयांच्या अतिरिक्त ”टिप” मागितली जाते.
ही रक्कम देण्यास नकार दिल्यास चालकांकडून प्रवास थेट रद्द केला जातो. अनेकदा चालकाकडून भलतेच कारण दिले जाते. त्यामुळे प्रवाशाच्या ॲपमध्ये अतिरिक्त दंड आकारला जातो. पुढे तो दंड रद्द करण्यासाठी प्रवाशाला प्रयत्न करावे लागतात. मात्र प्रवासाचे गणित बिघडते. दुसरे वाहन मिळेपर्यंत प्रवाशांचे भर रस्त्यात हाल होतात.
या संपूर्ण गंभीर प्रकरणाची दखल घेत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या प्रकरणी विशेष विनंती करत, प्रवाशांची अडवणूक करणाऱ्या अशा ॲप-आधारित टॅक्सी कंपन्या आणि चालकांवर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
”हा तर ग्राहकांना ओलीस ठेवण्याचा प्रकार” – डॉ. श्रीकांत शिंदे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परिवहन मंत्र्यांना समाज माध्यमांवर केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर लादली जाणारी ही पद्धत पूर्णपणे अन्यायकारक आहे. ऐन गरजेच्या वेळी प्रवाशांना वेठीस धरणे, त्यांची अडचण ओळखून त्यांचे आर्थिक शोषण करणे आणि जादा रक्कम देण्यास भाग पाडणे, हा प्रकार ग्राहकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे. ही केवळ चुकीची व्यावसायिक पद्धत नसून, ग्राहकांना अक्षरशः ओलीस ठेवण्यासारखी बाब आहे.
ग्राहकांकडून स्वेच्छेने मिळणारी टिप ही सेवेच्या गुणवत्तेची पावती असते. मात्र टिप किंवा अतिरिक्त शुल्कासाठी दबाव टाकणे, सेवा नाकारण्याची धमकी देणे किंवा ग्राहकांना मानसिक त्रास देणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे अशा शोषणात्मक आणि ग्राहकविरोधी प्रकारांवर तातडीने अंकुश ठेवून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गर्दीच्या वेळी आणि विमानतळ, रेल्वे स्थानकांवर लूट
ओला, उबर, रॅपिडोसारख्या ॲप-आधारित सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त पैशांच्या मागणीबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानके, मोठे व्यापारी केंद्रे तसेच गर्दीच्या वेळी चालक प्रवाशांशी थेट संपर्क साधतात आणि ॲपवर दाखवलेल्या अधिकृत भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे मागतात. मुंबईहून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, टिटवाळा या शहरांमध्ये जाण्यास नकार देत अतिरिक्त पैसे मागितले जातात. सायंकाळच्या सुमारास परतीचे भाडे मिळत नाही असे कारण सांगून प्रवास रद्द केला जातो.
परिवहन मंत्र्यांची प्रतिक्रिया
ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर जबरदस्तीने टिप मागणे हा प्रकार प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे. याबाबत संबंधित कंपन्यांवर परिवहन आयुक्तांना त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपापयोजना परिवहन विभागाकडून अंमलात आणण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात लवकरच नवे धोरण आणले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक्सद्वारे दिली आहे.
