जुना कोपरी पूल आठवडाभरात बंद

मुंबई-ठाणे शहराला जोडणारा कोपरी रेल्वे जुना उड्डाणपूल निर्माणासाठी येत्या आठवडाभरात बंद होण्याची शक्यता आहे.

प्रायोगिक चाचणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन; आठवडाभरात मार्गिकांच्या कामाला सुरुवात

ठाणे : मुंबई-ठाणे शहराला जोडणारा कोपरी रेल्वे जुना उड्डाणपूल निर्माणासाठी येत्या आठवडाभरात बंद होण्याची शक्यता आहे. ठाणे वाहतूक नियंत्रण पोलिसांनी जुना पूल बंद झाल्यास होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी करून त्रुटी जाणून घेतल्या आहेत. त्यानुसार  येत्या चार ते पाच दिवसांत या त्रुटी दूर करून कोपरी पुलाच्या मुख्य मार्गिका बंद केला जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई आणि ठाणे शहरातील वेशीवर असलेल्या अरुंद कोपरी पूलावरील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी एमएमआरडीए आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोपरी रेल्वे उड्डाण पुलाचा चार पदरी रस्त्याचे आठ पदरी निर्माणाचे काम सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे आणि एमएमआरडीएने नव्या दोन-दोन पदरी मार्गिकांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे आता मुख्य जुना पूल तोडून त्यावर आणखी दोन-दोन पदरी मार्गिकांचा पूल तयार केला जाणार आहे. या कामा दरम्यान शहरात वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. हा पूल निर्माण करण्यासाठी वर्ष किंवा त्याहून अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून पर्यायी रस्त्यांची चाचपणी तसेच त्रुटींचा अभ्यास वाहतूक शाखेकडून सुरू होता. मंगळवारी आणि बुधवारी वाहतूक शाखेने सकाळी ७.३० ते १०.३० आणि सांयकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत वाहतूक शाखेने प्रायोगिक तत्त्वावर जुना पूल बंद ठेवण्यात आला होता. या प्रयोगा दरम्यान परिरसरात काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानुसार पोलिसांना त्रुटी आढळून आल्या.

 एखादे वाहन बंद पडल्यास त्याचा परिणाम पूर्व द्रुतगती मार्गावर होऊ शकतो. त्यामुळे बंद वाहनाला रस्त्यामधून बाजूला काढण्यासाठी दोन क्रेन उपलब्ध करणे, वाहतूक पोलिसांच्या मदतीला १५० वाहतूक सेवकांचे मनुष्यबळ उपलब्ध करणे, पर्यायी मार्गावरील एका रस्त्यामध्ये येणारी वृक्षांच्या फांद्या छाटणे, पुलावरील वाहतूक वळविण्यासाठी रस्ता व्यापणाऱ्या अडथळय़ांऐवजी लहान अडथळे बसविणे, अशा उपाययोजना करण्याची विनंती वाहतूक शाखेने एमएमआरडीएला केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Old corner bridge closed week ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या