डोंबिवली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन आणि मुख्यमंत्री पद मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शिंदे समर्थकांनी बुधवारी गणेश मंदिर ते इंदिरा चौका दरम्यान आनंदोत्सव फेरी काढली होती. शिंदे समर्थक शिवसैनिक फेरीत सहभागी झाले होते. शिवसेना मध्यवर्ति शिवसेना शाखेचे शिलेदार म्हणून ओळख असलेल्या जुन्या निष्ठावान शिवसैनिकांनी मात्र आनंदोत्सव फेरीकडे पाठ फिरवली होती.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक अधिक संख्येने या आनंदोत्सव फेरीत सहभागी होतील अशी अटकळ बांधण्यात आली होती. परंतु प्रचारफेरीसाठी झोपडपट्टी, चाळी भागातून अधिक संख्येने कार्यकर्ते आले होते. आनंद दिघे यांचा नामघोष, शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ढोल ताशे, फटाक्यांच्या आताषबाजी करण्यात येत होती.

गणेश मंदिरात खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गणपती पूजन केल्यानंतर आनंदोत्सव फेरीला सुरूवात झाली. यावेळी मंदिर विश्वस्त मंदार हळबे, प्रवीण दुधे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम उपस्थित होते. निष्ठावान गटातील विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, शहरप्रमुख राजेश मोरे, रणजीत जोशी, जयंता पाटील, भाजपमधून शिवसेनेते दाखल झालेले नितीन पाटील, रवी पाटील, मनसेतून आलेले शरद गंभीरराव, सागर जेधे फेरीत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे सामान्य शिवसैनिकांनी २४ तास उपलब्ध असतील. करोना काळात शिंदे यांनी केलेल्या कामाची प्रत्येकाला आठवण आहे. विकास कामांबरोबर हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम अधिक जोमाने करतील, अशा भावना उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. शिंदे समर्थक शिवसैनिक अधिक संख्येने फेरीत सहभागी झाले होते. कल्याण, डोंबिवली शहर विकासासाठी त्यांचा अधिकाधिक हातभार लागेल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.