ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रिन्स रेसिडन्सी या हाॅटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीची हाॅटेलमधील कर्मचाऱ्याने हत्या केल्याचा शनिवारी प्रकार उघडकीस आला आहे. काराभाई सुवा असे मृताचे नाव असून याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिन्स रेसिडन्सी या हाॅटेलच्या खोली क्रमांक ३०३ मध्ये काराभाई सुवा राहत होते. शनिवारी त्यांचा मृतदेह खोलीमध्ये आढळून आला. प्रकरणाची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. काराभाई यांच्या अंगावर धारदार शस्त्राने टोचल्याचे खूणा होत्या. या घटनेनंतर हाॅटेलमधील कर्मचारी फरार झाला होता. त्याने ही हत्या केल्याचे समोर आल्याने त्याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



