एका रहिवाशाचे सोन्याचे ब्रेसलेट त्याच्या नकळत रस्त्यावर पडले. ते रस्त्यावर झाडू-टोपल्या, सुपडे विक्री करणाऱ्या ६० वर्षाच्या आजीला सापडले. आजीने ते आपल्याजवळ दडवून न ठेवता किंवा आता आपली दिवाळी झाली असा विचार मनात न आणता तिने ते रस्त्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले. वाहतूक विभागाने सोन्याच्या ब्रेसलेटच्या मालकाचा शोध घेऊन त्याला ते आजीच्या उपस्थितीत परत केले.

गुरुवारी सकाळी दहा वाजता हा सगळा प्रकार कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौकात घडला. जाहिदा शेख इसार (६) असे झाडू-सुपे विकणाऱ्या आजीचे नाव आहे. झाडू विक्रीतून ती आपली उपजीविका करते. जाहिदा शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वाहतूक विभाग कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी आजींना कार्यालयात बोलावून दोन हवालदारांसह त्यांचा सत्कार केला. या सगळ्या प्रकाराने आजीही भारावून गेली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक तरडे यांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी श्री कॉम्पलेक्स चाणाक्य नगर येथे राहणारे संकेत संजय ढेरंगे हे कल्याण रेल्वे स्थानक भागातील महात्मा फुले चौकातील एका नाश्ता खाद्य केंद्रात मोटारीने गुरुवारी सकाळी आले होते. केंद्राच्या बाहेर मोटार लावून खाण्यासाठी ते आत गेले होते. खाऊन झाल्यानंतर त्यांना आपल्या हातामधील दोन लाख रूपये किमतीची सोन्याचे ब्रेसलेट हातात नसल्याचे लक्षात आले. त्यांनी मोटारीत, मोटारीच्या चारही बाजुने बघितले. नाश्ता केंद्रात सर्वत्र शोध घेतला असता तिथेही आढळून आले नाही. ब्रेसलेट हरविले असे समजून ते घरी निघून गेले. घराच्या परिसरात त्यांनी शोध घेतला. तेथेही ते आढळून आले नाही.

महात्मा फुले चौकात एका कोपऱ्यावर जाहिदा झाडू विक्री करतात. झाडू खरेदीसाठी त्या ग्राहकांना आवाज देत असताना त्यांना रस्त्यावर एक सोन्याची वस्तू पडली असल्याची दिसली. त्यांनी ती उचलली. दुसऱ्याची वस्तू आपण घेऊन लखपती होणार नाही, असा विचार करून आपण ज्याच्या कष्टाची ही वस्तू त्याला ती परत केली पाहिजे या विचारातून जाहिदा शेख यांनी महात्मा फुले चौकात वाहतूक नियोजनासाठी उभ्या असलेल्या हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे, वाहतूक सेवक संतोष घोलप, सत्यजित गायकवाड यांना घडला प्रकार सांगितला.

आपण जी वस्तू तुम्हाला देते ती वस्तू मालकाच्या हातात गेली पाहिजे असे आर्जव आजीने वाहतूक पोलिसांना केले. चारही हवालदारांनी आजीला आश्वस्त केले. घडला प्रकार हवालदारांनी वरिष्ठ निरीक्षक तरडे यांना सांगितला. त्यांनी आजीसह हवालदारांना कार्यालयात बोलविले. चौकात, नाश्ता केंद्रात सकाळच्या वेळेत कोण कधी आले होते. याची माहिती काढण्यास सांगितले. एका मोटारीच्या आधारे पोलिसांनी आधारवाडी येथील संकेत ढेरंगे यांचा माग काढला. संकेत यांनी आपली ओळख आणि घडला प्रकार सांगितल्यावर हरवलेले ब्रेसलेट संकेत यांचेच आहे याची खात्री पटवली. आजी जाहिदा शेख यांच्या उपस्थितीत तरडे यांनी संकेत यांना त्यांचे ब्रेसलेट परत केले.