ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन

ठाणे कारागृहातील बंद्यांनी सादर केली देशभक्तीपर गीते

ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन ; ठाणे कारागृहातील बंद्यांनी सादर केली देशभक्तीपर गीते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सविवर्षानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारागृहातील बंद्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. त्यासह, जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन करण्यात आले.

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्मृतीस्तंभ, वधस्तंभास तसेच कारागृहात फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमेस आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अभिवादन केले.यावेळी त्यांनी कारागृहातील विविध कामांची तसेच सुविधांची पाहणी केली. वधस्तंभाच्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यात येत असून त्याची पाहणीही यावेळी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, कारागृह अधिक्षक हर्षद अहिरराव, तहसीलदार युवराज बांगर हे उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समिती आणि आमदार निधीतून कारागृहात विविध कामे सुरू आहेत. स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतीकारकांना फाशी देण्यात आलेल्या वधस्तंभाचा परिसर स्मारक म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २ कोटी आणि आमदार संजय केळकर यांच्या निधीतून ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. वधस्तंभाच्या ठिकाणी अम्पिथिएटर उभारणे, लाईट आणि साऊंडशो उभारणे, वधस्तंभ परिसराचे सुशोभीकरण आदी कामे सुरू आहेत. ही सर्व कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातील बंदीसाठी हा विशेष कार्यक्रम होत आहे, असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. बंदीजनांमध्ये अनेक कलागुण आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने केले पाहिजे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये कारागृहात असलेल्या बंदीजनांसाठीही काही उपक्रम राबवावा असे असे वाटत होते, त्यातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली, असे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मांडले. स्वातंत्र्य लढ्यात ठाणे कारागृहात बंदी असलेल्या तसेच इथे फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती भावी पिढीला व्हावी, यासाठी वधस्तंभ स्मारकाचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कारागृहातील बंद्यांसाठी आणखी चांगल्या सुविधा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे,असे देखील ते म्हणाले.

देशभक्तीपर नृत्य-गीतांतून बंद्यांनी जागविल्या आठवणी

या कार्यक्रमात कारागृहातील बंद्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच पुरुष व महिला कैद्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जागविल्या. ऐ मेरे प्यारे वतन, वंदे मातरम्, माँ तुझे सलाम अशा विविध गीतांवर कैद्यांनी नृत्य केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाण्यात मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शन ; नागरिकांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी