ठाण्यात आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम | On the occasion of Anand Dighe birth anniversary in Thane Shinde group is preparing forshow of strength, Cm Eknath Shinde will be present at the event | Loksatta

ठाण्यात आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम

दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदे गटाकडून टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम आणि दिघे यांच्या स्मृतिस्थळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Anand Dighe birth anniversary thane
ठाण्यात आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी (लोकसत्ता ग्राफिक्स)

शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने शिंदे गटाकडून टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम आणि दिघे यांच्या स्मृतिस्थळी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे समजते.

हेही वाचा – ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

दिघे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी ठाकरे गटाने ठाण्यात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे गटाने शक्तिप्रदर्शन केले होते. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक शहरात पहिल्यांदा लावले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात होणाऱ्या दिघे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे महत्व वाढले असून, या कार्यक्रमानिमित्ताने शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेल मुख्यमंत्री शिंदे हे काय उत्तर देणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे दौऱ्याला सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांबरोबर ‘परीक्षा पे चर्चा’ असा दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने किसननगर येथील महापालिका शाळा क्र. २३ मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता ठाण्यातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के आयोजित ‘गणांक’ गणेशमूर्ती प्रदर्शनाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री शिंदे हे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त टेंभी नाका येथील कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता ते ऐरोली ते काटई नाका रस्त्याच्या भुयारी मार्गाची पाहणी करणार आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 10:16 IST
Next Story
ठाणे : भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून एकाचा मृत्यू