डोंबिवली येथील पूर्व भागातील आयरे गावात शुक्रवारी सायंकाळी अधिनारायण ही तीन माळ्याची धोकादायक इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी एका महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले आहे. आणखी एकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ५० वर्षापूर्वी लोड बेअरिंग पध्दतीने बांधलेल्या अधिनारायण इमारतीत एकूण ४० कुटुंब राहत होती.
ही इमारत अतिधोकादायक असल्याने पालिकेच्या ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी या इमारतीमधील रहिवाशांना सदनिका खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. काही कुटुंब या इमारतीमधील घरे सोडून यापूर्वीच अन्यत्र राहण्यास गेली आहेत. काही कुटुंबांना शुक्रवारी सकाळी घराबाहेर काढण्यात आले. तर या इमारतीमध्ये अरविंद संभाजी भाटकर (७०) हे एकटेच राहतात. ते बिछान्याला खिळून आहेत. सुनील बिरझा लोढाया (५५) आणि दीप्ती सुनील लोढाया (५४) हे दाम्पत्य सुद्धा इमारतीत राहत होते. दीप्ती या मानसिक दृष्टया आजारी आहेत.




भाटकर आणि लोढाया हे दोन्ही कुटुंब घराबाहेर पडण्यास कर्मचाऱ्यांना नकार देत होते. सायंकाळी या इमारतीचे दोन मजले कोसळले. या ढिगाऱ्याखाली हे तिघेजण अडकले. अग्निशमन दलाच्या जवांनी तातडीने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत बचाव आणि ढिगाऱा बाजुला करण्याचे काम सुरू केले आहे. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जवानांना ढिगाऱ्या खाली अडकलेल्या दोन जणांना बाहेर काढले आहे. त्यापैकी सुनील लोढाया यांचा मृत्यू झाला आहे. तर दीप्ती लोढाया या बचावल्या आहेत. भाटकर यांचा ढिगाऱ्याखाली शोध घेण्यात येत आहे.