मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून सम्राटनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालकाचा ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाला. या अपघातात एका मुलाचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

नासिर शेख (१४) असे अपघातात मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. विशाल सोनावणे, अशिक इनामदार, प्रभाकर सलियान, अब्दुल वफा, फरीद शेख, आशा दाधवड अशी जखमींची नावे आहेत. शनिवारी रात्री मुंब्रा बाह्यवळण मार्गावरुन एक सिमेंट मिक्सर वाहतूक करत होता. हे वाहन बाह्यवळण मार्गावरून सम्राटनगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर जात असताना वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मिक्सर बाजूच्या प्रथमेश सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात झाला. यात एकूण सात स्थानिक रहिवाशी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी नासिर चा मृत्यू झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed six injured after cement mixer truck overturn zws