scorecardresearch

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूने आणखी एकाचा मृत्यू ; मृतांची संख्या पोहोचली सहावर

तर, जिल्ह्यात २८३ स्वाईन फ्लूचे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूने आणखी एकाचा मृत्यू ; मृतांची संख्या पोहोचली सहावर
(संग्रहीत छायाचित्र)

जिल्ह्यात स्वाईन फ्लू मुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून हा रुग्ण कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. तर, दिवसेंदिवस स्वाईन फ्लू बाधितांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८३ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे २०६ रुग्ण हे ठाणे शहरातील असल्याची माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मंगळवारी आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सहा इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरातील आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लू मुळे मृत झालेल्यांमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या २१० इतकी होती. यामध्ये पाच दिवसात ७३ ने वाढ झाली असून सद्यस्थितीला स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या २८३ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २०६ रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. त्यापाठोपाठ, कल्याण-डोंबिवली ४४, नवी मुंबई २२, मिरा भाईंदर पाच, ठाणे ग्रामीण तीन, बदलापूर दोन आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा सामावेश आहे. यापैकी जिल्ह्यात सध्या १३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, उर्वरित १४१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये चार रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. तर, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ क्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवार पर्यंत स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच होती. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात एका रुग्णांचा मृत्यु झाल्याने ही संख्या सहावर पोहचली आहे. कल्याण-डोंबविली पालिका क्षेत्रात मृत्यू झालेल्या रुग्ण ७० वर्षांचा होता. त्याला काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूची लागण झाली होती. दोन दिवसापूर्वी या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाच्या मृत्यूची नोंद मंगळवारी जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One more death due to swine flu in thane district amy 95