रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त महाव्यवस्थापकाची ऑनलाइन फसवणूक

रामनगर पोलीस ठाण्यात रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

डोंबिवली : ‘तुम्ही आमच्या मोबाइल कंपनीचे ग्राहक आहात, यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक माहिती पाठवा’, असे मोबाइलवर लघुसंदेश पाठवून डोंबिवलीत राहात असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या एका निवृत्त साहाय्यक महाव्यवस्थापकाची सहा मिनिटांच्या अवधीत अज्ञातांनी ऑनलाइन व्यवहारातून तीन लाख रुपयांची फसवणूक केली.

अनंत सिद्धेश्वर मराठे असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सारस्वत वसाहत येथे राहतात. रामनगर पोलीस ठाण्यात रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी माहिती दिली की, अनंत मराठे यांना रविवारी दुपारी बारा वाजता त्यांच्या मोबाइलवर ‘तुम्ही आमचे ग्राहक आहात’ हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करा, (केवायसी) अन्यथा तुमचे मोबाइल सीम बंद होईल’ असा लघुसंदेश आला. समोरील व्यक्तीने मराठे यांना संपर्क केला. आपण आपल्या मोबाइलमधील सीमकार्ड अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइलमध्ये टाका. त्या सूचनेप्रमाणे मराठे यांनी स्वत:च्या आयफोनमधील सीमकार्ड काढून ते पत्नीच्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइलमध्ये टाकले. आपण सीमकार्ड बदलण्याची प्रक्रिया केली आहे, असे मराठे यांनी समोरील व्यक्तीला कळविले. त्याने तुमची केवायसी प्रक्रिया शिल्लक आहे. ती अपग्रेड करणे आवश्यक आहे, असे सांगितले. पुढे मराठे यांनी भुरट्याच्या सूचनेप्रमाणे पत्नी मीनाक्षीच्या मोबाइलवर प्रक्रिया केली. भुरट्याने मराठे यांना प्रक्रिया शुल्क म्हणून १० रुपये नेट बैंकिंगच्या साहाय्याने पुनर्भरण (रिचार्ज) करण्यास सांगितले. भुरट्याने मराठे यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवर मराठे यांनी संपर्क करताच,  त्यांच्या एचडीएफसी बॅँकेच्या खात्यातून सहा मिनिटांच्या अवधीत तीन लाख रुपये काढून घेण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Online fraud of a retired general manager of the reserve bank akp

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या