डोंबिवली : पारपात्र काढण्यासाठी लागणारी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया डोंबिवली एमआयडीसीतील टपाल पारपत्र सेवा केंद्रात सुरू झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, पदवी शिक्षण झालेले विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अधिक संख्येने पारपत्राची विचारणा आणि नोंदणी करण्यासाठी येऊ लागले आहेत, अशी माहिती पारपत्र कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

 डोंबिवली, कल्याण, बदलापूर, टिटवाळा भागातून पारपत्र काढण्यासाठी रहिवासी विचारणा करण्यासाठी येऊ लागले आहेत, असे अधिकारी म्हणाला. पारपत्र कार्यालयात टपाल कार्यालयाचे दोन प्रशिक्षित कर्मचारी आणि पारपत्र विभागाचा कर्मचारी पारपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी आहेत, असे डोंबिवली औद्योगिक विभागातील टपाल विभागाच्या टपाल मास्तर स्नेहल कदम यांनी सांगितले. पारपत्र सेवा केंद्रात येणाऱ्या रहिवाशांना पारपत्र काढण्याची माहिती दिली जात आहे. पारपत्र काढण्याच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. पारपत्र कार्यालयात विचारणा करण्यासाठी येणाऱ्या बहुतांशी तरुणांनी आम्हाला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जायाचे आहे. त्यासाठी आतापासून पारपत्राची तयारी करीत आहोत, असे सांगितले. आमची मुले परदेशात आहेत. आयुष्यात एकदा तरी परदेशवारी करावी या विचारातून पारपत्र काढणार आहे, असे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.