ठाणे : महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे ६५ ते ७० टक्के पुर्ण झाल्याचा दावा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काही दिवसांपुर्वी केला असतानाच, शहरात जेमतेम ४० ते ५० टक्केच नालेसफाईची कामे पुर्ण झाल्याची बाब पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीतून समोर आली आहे. संथगतीने सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामांवरून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून पालिका प्रशासनाने रात्री उशीरापर्यंत ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांची कानउघडणी केली. तसेच कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पुर्ण करा नाहीतर तुमच्या वर कारवाई होणार असा इशारा प्रशासनाने ठेकेदारांना दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी मे महीन्यात नालेसफाईची कामे सुरु करण्यात येतात. पाऊस सुरु झाला तरी हि कामे पुर्ण झालेली नसतात. यावरून टिका होत असल्यामुळे पालिकेने यंदा एप्रिल महिन्यांतच नालेसफाईची कामे हाती घेतली. असे असले तरी नालेसफाईची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, गमबुट तसेच इतर आरोग्याच्या दृष्टीने असलेली साधने पुरविली जात नसल्याची ओरड होत असून त्यातच नालेसफाईच्या कामासाठी वापरली जाणारी पद्धत कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. यामुळे टिकेचे धनी ठरलेल्या पालिका प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशीरा ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांची खरडपट्टी केली. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडलेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, डॉ. बालाजी हळदेकर, कार्यकारी अभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि ठेकेदार उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येक ठेकेदाराकडून कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी काही ठेकेदारांनी ६० ते ७० टक्के तर काहींनी ९० टक्के नालेसफाईची कामे केल्याचा दावा केला. स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र हे दावे खोडून काढत नालेसफाई निरिक्षणातून केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाईची कामे पुर्ण झाल्याचे स्पष्ट केले. तसेच काही ठिकाणी नाल्यातून गाळ काढलेला नसल्याचेही माहिती त्यांनी दिली. पुरेशी यंत्रणा आणि साधन सामुग्री उपलब्ध नसून काही ठिकाणी दलदल असल्यामुळे गाळ काढता येत नसल्याचे स्पष्टीकरण ठेकेदारांनी दिले. या स्पष्टीकरणामुळे संतापलेल्या अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी संबंधित ठेकेदारांना फैलावऱ् घेऊन खडेबोल सुनावले. कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पुर्ण करा नाहीतर तुमच्या वर कारवाई होणार असा इशारा त्यांनी दिला.

अन्यथा ठेकेदारांची खैर नाही

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट भागात नालेसफाईची कामे ५० टक्के झाली असल्याची बाब बैठकीत समोर येताच अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी संताप व्यक्त केला. शहरातील नालेसफाईची कामे योग्यप्रकारे व्हावीत यासाठी पालकमंत्री आणि आयुक्त हे आग्रही आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराची नालेसफाई योग्यप्रकारे झाली पाहिजे असे आदेश त्यांनी यावेळी दिले, तसेच डोळ्यात तेल घालून काम करा अन्यथा ठेकेदारांची खैर नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे समाधानकारकरीत्या सुरु आहेत. ३१ मे पर्यंत ही कामे पुर्ण करण्यासंबंधीच्या सुचना ठेकेदारांना बैठकीत दिल्या आहेत. याशिवाय, शहरात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याच्या सुचना ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.