पाच शहरांना पाणी देणाऱ्या बारवी धरणात केवळ ९.०६ टक्के पाणी शिल्लक
ठाणे शहरामध्ये तुफान बरसणाऱ्या पावसाच्या सरींनी धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे मात्र पुरती पाठ फिरवल्याचे चित्र आहे. शहरात रविवारी पावसाने ७२ मिमी सरासरी गाठलेली असताना बारवी धरणक्षेत्रात २४ मिमी, तर भातसाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ ४० मिमी पाऊस पडला. मोडकसागर आणि तानसा धरण क्षेत्रात ३१.४० मिमी पावसाने हजेरी लावली, तर पुणे जिल्ह्य़ातील आंदर धरण क्षेत्रात केवळ ३ मिमी पाऊस पडला आहे. शहरी भागाच्या तुलनेने धरण क्षेत्रात ५० टक्क्यांहून कमी पाऊस पडत असल्याने पाणीपुरवठय़ाची स्थिती नाजूक बनली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या पाच शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात अवघा ९.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. tv03त्यामुळे शहरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार कायम असल्याची माहिती ठाणे पाटबंधारे विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
नेहमी आधी धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावून मग शहरांकडे वळणाऱ्या मोसमी पावसाने यंदा उलटा मार्ग अनुसरला आहे. १ जूनपासून आतापर्यंत ठाणे शहरात एकूण ६४५ मिमी पाऊस पडला असला तरी बारवी परिसरात फक्त १२८ मिमी पाऊस पडला आहे, तर भातसा धरणात १६५ मिमी, मोडकसागर १६९ मिमी, तानसा १६५ मिमी, तर आंध्रा धरण क्षेत्रात केवळ ७९ मिमी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची ही सरासरी ठाणे शहराच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, अंबरनाथ या शहरांसह २७ गावांमध्ये बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात सध्या ०.५८ टीएमसीइतके पाणी असून केवळ ९.०६ टक्के धरण भरलेले आहे. या परिसरात पाऊस असला तरी हे पाणी मोठय़ा प्रमाणात जमिनीमध्ये झिरपून जाते. त्यानंतर झरे, धबधबे आणि ओहळांचे प्रवाह सुरू होऊन धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी पुढील काही काळ चांगल्या पावसाची गरज आहे. पुढील काही काळात समाधानकारक पाऊस पडल्यास त्याचा धरण क्षेत्रास फायदा होऊ शकतो, मात्र त्यासाठी थोडी आणखी वाट पाहावी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर नद्यांचे प्रवाह, झरे, धबधबे वाहू लागतात आणि धरणांत पाणी येण्यास सुरुवात होत असते. मात्र सध्याचा पाऊस तितकासा जोरदार नसल्याने धरणांत पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही. सध्या उल्हास नदीमध्ये दिसणारे पाणी पाणलोट क्षेत्रातील नसून परिसरातील शहरातून वाहून जाणारे पाणी आहे. १५ जुलैपर्यंतच्या पाणी कपातीचे नियोजन करण्यात आले असून पावसाने जोर धरून पाणी वाढल्यास ही कपात बंद करण्यात येईल, मात्र तोपर्यंत ही कपात सुरू राहणार आहे.
– सुभाष वाघमारे, अधीक्षक अभियंता, लघुपाटबंधारे विभाग ठाणे</strong>