खाऊखुशाल : झणझणीत मुनमुन मिसळ

वडापावपासून थालिपीठापर्यंत अनेक पदार्थानिशी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे

वडापावपासून थालिपीठापर्यंत अनेक पदार्थानिशी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे. या प्रत्येक पदार्थाची स्वत:ची चव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही गेलात तर तो पदार्थ त्या विशिष्ट चवीचाच असेल तर खाणाऱ्याला पसंत पडतो. मात्र, महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीत एक पदार्थ असाही आहे, जो प्रदेशानुसार आपली चव बदलतो आणि तरीही तो खवय्यांना भावतो. तो पदार्थ म्हणजे मिसळ. मिसळ म्हटलं की झणझणीतपणा. लालभडक रश्श्यात न्हाऊन गेलेली कडधान्यांची उसळ, त्या र्तीवर अर्धवट तरंगणारा फरसाण चिवडा या सगळय़ांना व्यापून टाकणारा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असं मिश्रण असलेल्या मिसळीत पावाचा एक तुकडा डुंबून जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तो जिभेवर पोहोचण्यासाठी आतूर झालेला असतो. मिसळीचं हे कवित्व केवळ शब्दांत मांडण्यासारखं नाही. ते चाखावंच लागतं. त्यामुळेच अस्सल खवय्ये चविष्ट मिसळ मिळणाऱ्या ठिकाणांना अगदी वाट वाकडी करून भेट देतात. अशा खास चवीच्या अड्डय़ांपैकी एक आहे- डोंबिवलीतील मुनमुन मिसळ.
३० वर्षांपूर्वी कमल मुर्डेश्वर यांनी डोंबिवली शहरात मिसळचे दुकान मांडले. चाकरमानी, मराठमोळ्या आणि खवय्ये असणाऱ्या डोंबिवलीकरांनी या मिसळ-पावाला पटकन आपलेसे केले. यामध्ये तीन प्रकारची मिसळ मिळते. ज्या लोकांना खूप तिखट खाणे सहन होत नाही, अशांसाठी कमी तिखट, काहींना मध्यम तिखट आणि काहींना खूप तिखट मिसळ खायला आवडते. त्याप्रमाणे ही मिसळ ग्राहकांच्या आवडीनुसार खायला देण्यात येते. आजीच्या हाताची चव अनुभवायची असल्यास या मिसळ-पावचा आपण आस्वाद घेऊ शकतो. हे मिसळ-पावचे दुकान जरा लहान आहे. त्या मानाने येथे गर्दी जास्त असल्याने या दुकानाबाहेर आपला नंबर कधी येतो, याची वाट बघावी लागते. त्यामुळे मिसळच्या घमघमाटामुळेच कधी एकदा मिसळ खातो असे खवय्यांना होते.मिसळ खाल्ल्यानंतर जागेअभावी तेथे उगाचच गर्दी करू नये आणि त्यामुळेच योग्य तेवढेच सुट्टे पैसे दिल्यानंतर तेथे गर्दी होत नाही असे आजींना वाटत असल्याने ३० रुपये सुट्टे घेऊन जाणे भाग आहे. आज गेली ३० वर्षे एक महिला म्हणून अतिशय उत्तमरीत्या त्यांनी हा व्यवसाय खंबीरपणे चालवला असून आजही त्या वयाच्या ७५व्या वर्षीही स्वत हा व्यवसाय चालवितात. ही मिसळ खायची झाल्यास सायंकाळी ४.३० ते ८.३० या वेळेतच जावे लागते. रविवारी मात्र आजींच्या या दुकानाला सुट्टी असते. त्यामुळे सोमवार ते शनिवार या दिवसातच या मिसळ-पावावर ताव मारता येतो. ही मिसळ गरमागरम कट, फरसाण, रस्सा, कांदा आणि त्यावर लिंबू पिळून, टॉमेटो, कोथिंबीर आदी पदार्थाची सजावट करून ग्राहकांना खाण्यासाठी दिली जाते. या मिसळच्या दुकानाला खास आज्जीची मिसळ असेही संबोधले जाते. त्यावर थंडगार ताक पिण्याची और काही वेगळीच आहे. आज्जीने घरी तयार केलेल्या मसाल्यांमुळेच ३० वर्षांत तीच चव टिकून राहिली आहे. त्यामुळे पुणेरी आणि कोल्हापुरी मिसळ ३० वर्षांपूर्वीच डोंबिवलीकर झाली असून मुनमुन मिसळ म्हणजे डोंबिवलीची खास ओळख असल्याचे अनेकजण सांगतात. तरुणच नव्हे, तर वृद्धांनाही या मिसळ-पावची चव पुन्हा पुन्हा चाखावीशी वाटते.चमचमीत खाणार त्यांना कमलआज्जी खायला घालणार अशी जणू डोंबिवलीकरांची धारणाच झाली आहे. ही मिसळ जर पार्सल म्हणून घरी न्यायची असल्यास आज्जीचा ओरडा खावा लागतो. कारण गर्दीच्या वेळेत पार्सल देणे कठीण होते आणि दुकानात काम करणाऱ्यांची तारांबळ उडत असल्यामुळे पार्सल द्यायलाही वेळ लागतो.
आजकाल पालक आपले पाल्य पोषक पदार्थ खात नसल्याचे आरोप सातत्याने करत असतात. मात्र कडधान्याने बनवलेली ही मिसळ चमचमीत चवीसोबत शरीरात प्रथिने पुरवण्याचेही काम करते. मिसळ हा पदार्थ ‘तरी’ शिवाय खाण्यात मजाच नसते आणि म्हणूनच आजींची गरमागरम ‘तरी’ खाण्यातील गंमत काही औरच आहे. फरसाण जास्त टाकणे हे या मुनमुन मिसळचे वैशिष्टय़ आहे. ताजे पाव ग्राहकांना खायला मिळावे यासाठी आजी खूप आग्रही असतात. या मुनमुन मिसळचे दुकान ज्या परिसरात आहे त्या परिसरात चमचमीत आणि चवदार मिसळचा घमघमाट सुटलेला असतो. त्यामुळे तेथून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येकालाच ही मिसळ खाण्याचा मोल आवरता येत नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये २००-३०० रुपये खर्च करण्यापेक्षा ही ३०-३५ रुपयाची मिसळ खाऊन मन तृप्त होते. या दुकानात महाराष्ट्रीयच नव्हे, तर दाक्षिणात्य, गुजराती लोकही आवर्जून भेट देतात.खिशाला परवडेल आणि पोटही भरेल अशी ही गरमागरम मिसळ बघून तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल!

कुठे- मुनमुन मिसळ
पत्ता- व्होडाफोन स्टोअरच्या बाजूला, डोंबिवली स्टेशनजवळ,डोंबिवली (प.)
वेळ- सायंकाळी ४.३० ते ८ वाजता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Only for missal lovers

ताज्या बातम्या