पालिकेची भिस्त अनुदानावरच

करोनाकाळात महापालिकेच्या मालमत्ता कर तसेच पाणी देयकांची वसुली अपेक्षित होत असली तरी शहर विभागासह इतर विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे.

उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम; ठेकेदारांची देणी मुद्रांक शुल्कांच्या अनुदानातून

ठाणे : करोनाकाळात महापालिकेच्या मालमत्ता कर तसेच पाणी देयकांची वसुली अपेक्षित होत असली तरी शहर विभागासह इतर विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानातून पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात असून, त्यापोठापाठ आता शासनाकडून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कांच्या अनुदानातून ठेकेदारांची देणी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे महापालिकेची भिस्त अनुदानावरच असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली. या प्रकल्पांच्या निधीसाठी पुढील दोन ते चार वर्षांतील अर्थसंकल्पामध्ये आधीच तरतूद करण्यात आली. यामुळे महापालिकेवर चार हजार कोटींच्या आसपास दायित्व आहे. त्यातच गेल्या दीड वर्षांत करोना संकटामुळे महापालिकेच्या जमा-खर्चाचे गणित बिघडले. यामुळे महापालिकेला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेकडे १ हजार ४४१ कोटी रुपये जमा झाले. त्यामध्ये मालमत्ता कर, पाणी देयक तसेच इतर करांपोटी ६०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर शासनाकडून वस्तू आणि सेवा करापोटी ५२९ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित रक्कम क्लस्टर आणि इतर अनुदानातून मिळाली आहे. १ हजार ४४१ कोटींपैकी १ हजार १२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यात महसुली खर्च ९४० कोटी रुपये, तर भांडवली खर्च १८० कोटी रुपये झाला. पालिकेकडे जेमतेम १५ कोटींच्या आसपास पैसे शिल्लक असून उर्वरित पैसे अनुदानाच्या रकमेतील आहे. त्यातच ठेकेदारांकडून सातत्याने देयके देण्याची मागणी होऊ लागली होती. पुरेसे पैसे शिल्लक नसल्यामुळे पालिकेने देयके थांबविली होती. करापोटी पैसेच जमा होत नसल्यामुळे पालिकेने अखेर अनुदानाच्या रकमेतून ठेकेदारांची देणी देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या मुद्रांक शुल्काच्या रकमेतून ही देयके दिली जात आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

शहर विकास विभागाकडून १७१ कोटींचे उत्पन्न

मालमत्ता कर तसेच पाणी देयकांची अपेक्षित होत असली तरी शहर विकास विभागासह इतर विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. शहर विकास विभागाकडून दरवर्षी ७०० ते ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, परंतु गेल्या वर्षी करोना संकटामुळे नवे गृहप्रकल्प ठप्प झाल्याने पालिकेला जेमतेम १४९ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. करोनाची परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून आटोक्यात असल्याने नव्या गृहप्रकल्पांचे प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. जुने ठप्प झालेल्या गृहप्रकल्पांची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. यामुळे पालिकेला यंदा १७१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झाली असली तरी करोनाकाळाआधीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ते कमी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Only grant municipality ysh

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या