परदेशातील पर्यटनाच्या धर्तीवर ‘कचरा बेट’ ठाणेकरांसाठी खुले करा, मनसेची पालिका प्रशासनाकडे उपहासात्मक मागणी

ठाणे येथील कापुरबावडी भागातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे ढिग जमा झाले असून सोमवारी सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या नाल्यामध्ये उतरून आंदोलन केले.

MNS mockingly demands municipal administration
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ठाणे : ठाणे येथील कापुरबावडी भागातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे ढिग जमा झाले असून सोमवारी सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या नाल्यामध्ये उतरून आंदोलन केले. मालदीव, बाली आणि सिंगापूर येथे कचऱ्याच्या ढिगावर शास्रोक्तक पद्धतीने बेट तयार करून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनविण्यात आला असून त्याचधर्तीवर कापूरबावडीच्या नाल्यात तयार झालेल्या कचऱ्याचे बेटाचे लोकार्पण करून ठाणेकरांसाठी नवीन पर्यटन केंद्र खुले करावे, अशी उपहासात्मक मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.

कापुरबावडी भागातील नाल्यात तब्बल १०० ते १५० मीटरपर्यंत कचऱ्याचे ढिग जमा झाले असून त्याचा त्रास गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा येथील वीस हजार नागरिकांना होत आहे. याठिकाणी कचरा साठून बेट तयार झाल्याचे दिसून येत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी याठिकाणी आंदोलन केले. त्यांनी नाल्यातील या कचऱ्याच्या बेटावर उतरून पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. लवकरात लवकर येथील कचरा स्वच्छ न केल्यास हे कचऱ्याचे ढीग पालिका अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर नेऊन टाकले जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा >>> ठाण्यातील रस्ते कामांचे आयआयटीकडून पाहणी सुरु

पालिकेच्या वतीने या बेटाचे नामकरण करावे तसेच ठाण्यातील नागरिकांना कचऱ्याचे बेट बघण्याचा अनुभव उपलब्ध करून द्यावा. नागरिकांना महापालिकेच्या स्वच्छ ठाणे धोरणाची पुरेपूर माहिती या बेटामुळे मिळेल व त्यांना विदेशात जे बेट बघण्याचा अनुभव येतो, तोच अनुभव ठाण्यात घेता येईल, असा टोला महिंद्रकर यांनी यावेळी लगावला. नव्या अर्थसंकल्पामध्ये पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छ ठाणे या लेखा शीर्षक अंतर्गत ठाणे शहर कचरा मुक्त करण्यासाठी अंदाजे ८५ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. तसेच ठाण्यातील कचरा संकलित करण्यासाठी उभारण्यात आलेले सीपी तलाव येथे हस्तांतरण केंद्र अद्यावत करण्याच्या अनुषंगाने २३ कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. पालिकेच्या वतीने वर्षाला करोडो रुपये फक्त घनकचरा विभागाच्या विविध प्रकल्पावर खर्च केले जातात. तसेच दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये ठाणे शहर कचरामुक्त करण्यासाठी निधी प्रस्तावित केला जातो. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने ठाणे कचरा मुक्त होण्यापासून वंचित राहते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 18:44 IST
Next Story
ठाण्यातील रस्ते कामांचे आयआयटीकडून पाहणी सुरु
Exit mobile version