दोन कोटी लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात साथीच्या रोगांवर परिणामकारक उपचार करणारे एकही रुग्णालय नाही. त्यामुळे येथील रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात धाव घ्यावी लागते. जिल्ह्य़ातील आरोग्य सुविधेतील ही उणीव भरून काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने साथीच्या रोगांवर उपचार करणारे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.

खारेगाव येथील चार एकर जागेत हे रुग्णालय उभारले जाणार असून त्याचा लाभ कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, वाडा, शहापूर आदी परिसरातील रुग्णांनाही होणार आहे. जिल्ह्य़ातील आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत संबंधितांची एक बैठक अलिकडेच आयोजित करण्यात आली होती. त्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात साथीच्या रोगांवर उपचार करणारे रुग्णालय उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. शंभर खाटांची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात प्रत्येक संसर्गजन्य रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष, किमान २० खाटांचा आयसीयू कक्ष, लहान मुलांसाठी स्वतंत्र आयसीयू कक्ष, पीएफटी यंत्रे, मेडिकल फर्निचर, व्हेन्टीलेटर, आयसीयू मॉनिटर्स, पल्स ऑक्सिमिटर, इसीजी मशिन, डिजिटल एक्स-रे मशिन, पोर्टेबल मशिन, सोनोग्राफी आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.