यंदा गणेश मूर्तीची ‘व्हिडीओ कॉलिंग’द्वारे निवड

गणेश मूर्तीचे प्रदर्शन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आ

Ganesh idol
गणेश मूर्तीचे प्रदर्शन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आ

शाडूच्या गणेश मूर्ती बनविणाऱ्या मोरया फाऊंडेशनने यंदा आधुनिकतेची कास धरत गणेश मूर्तीचे प्रदर्शन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मुलुंड येथील गवाणपाडा आणि ठाण्यातील कलाभवनमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याला ठाणे महापालिकेचे सहकार्य लाभले आहे.

व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या श्रीकृष्णा शिवणे आणि शैलेश घोलप यांनी दोन वर्षांपूर्वी शाडूच्या मूर्तीच्या प्रसाराचा उपक्रम हाती घेऊन ‘मोरया फाऊंडेशन’ची स्थापना केली. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकणाऱ्या विघ्नेश जांगळे या विद्यार्थ्यांच्या साथीने या वर्षी शाडूच्या मूर्तीसह पर्यावरणपूरक आकर्षक मखर, मूर्तीना खड्डय़ांच्या दागिन्यांनी सजवणे यांसारखे उपक्रम सुरूकरण्यात आले आहेत. शाडूच्या गणेश मूर्ती गणेशोत्सवाच्या काही महिने आधी सांगाव्या लागतात. यंदा मोरया फाऊंडेशन या संकल्पनेअंतर्गत व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून गणेशभक्तांना मूर्ती पाहता येणार असल्याने संपूर्ण प्रदर्शनातील मूर्तीची माहिती गणेशभक्तांना करून दिली जाणार असल्याचे मोरया फाऊंडेशनचे शैलेश घोलप यांनी सांगितले.

ठाण्यातील कापूरबावडी येथील ‘ठाणे कलाभवन’ आणि मुलुंडमधील सेंटर पॉइंट टॉवर येथे गणेश चतुर्थीपर्यंत सकाळी ११ ते रात्रौ ९ या वेळेत मोरया फाऊंडेशनच्या शाडू मूर्तीचे प्रदर्शन खुले राहणार आहे.

ठाणे कलाभवनसाठी ९८३३४३११४८ आणि मुलुंड सेंटर पॉइंट येथील शाखेसाठी ९७६९६७२३९४ या मोबाइल क्रमांकावर गणेशभक्तांनी ‘व्हॉटस्अ‍ॅप मेसेज’ करून व्हिडीओ कॉलिंगसाठी वेळ नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते १० या वेळेत गणेश भक्तांच्या मोबाइलवर गणेशमूर्तीचे प्रदर्शन ‘लाइव्ह’  प्रकट होईल. त्यातून मूर्तीची नोंदणी केली जाईल.

दरवर्षीप्रमाणेच या मोबाइल क्रमांकावर गणेशभक्तांनी व्हॉटस्अ‍ॅप मेसेज केल्यास त्यांना विविध प्रकारच्या शाडूच्या गणेश मूर्तीची छायाचित्रे पाठवून मूर्तीची लांबी, रुंदी, उंची तसेच किंमत या गोष्टींची माहिती देण्यात येईल. त्यातून निवडलेल्या मूर्तीची व्हॉटस्अ‍ॅपवर नोंदणी झाल्यानंतर केवळ शुल्क देण्यासाठी गणेशभक्ताला प्रदर्शनाला भेट द्यावी लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Opportunity to watch ganesh idol through video calling