कल्याण – मलंग गड क्षेत्राला हिंदुत्ववादी दर्जा मिळावा म्हणून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्यावेळी नक्की प्रयत्न करू. या क्षेत्राला तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करू. आता सर्वधर्मियांचे हे ठिकाण असले तरी या क्षेत्राला हिंदूंचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे. शासन दरबारी तशी त्याची नोंद घेतली जावी, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. याआधी खरे हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे आता नकली हिंदुत्ववादी झाले आहेत, असा टोला शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलंग गडाविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
आनंद दिघे यांच्या प्रयत्नामुळे ३९ वर्षांपासून मलंग गडावरील माघी पौर्णिमा उत्सव सुरू झाला. ती परंपरा आजही शिवसैनिकांनी सुरू ठेवली आहे हे सांगताना खा. राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख टाळला. अनेक वर्षांत याठिकाणी पाणी, रस्ते, फ्युनिक्युलर ट्राॅली, बस स्थानक सारख्या सुविधा निर्माण होणे गरजेचे होते. त्या निर्माण झाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी व्यक्त केली. आता मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने येतील. त्याच हवाई वाहनाने निघून जातील. समस्या कायम राहतील, असे सांगत येथे सुविधा देण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. अनेक वर्ष भाविक, ज्येष्ठ, वृद्ध पायी गडावर जातात. यात्रेच्या काळात शिवसैनिकांना पायी जावे लागते. याचा या मंडळींनी विचार करावा. मलंग गडावर महाराजांचे दर्शन घेताना यांना चांगली बुद्धी येवो. शिवसैनिकांना किरकोळ कारणावरून त्रास देण्याची आणि शिवसेनेच्या शाखांवर कब्जा करण्याचे प्रकार यांच्या हातून होऊ नयेत. अशी बुद्धी महाराजांनी यांना द्यावी, अशी खोचक टीका खा. विचारे यांनी शिंदे पिता-पुत्रावर केली.
ठाकरे समर्थकांनी मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर समुहाने गडावर जाऊन धार्मिक स्थळाचे दर्शन घेतले. ठाकरे, शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन मलंग गड यात्रेच्या निमित्ताने केले. याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी दोन्हीकडच्या नेत्यांनी आणि पोलिसांनी घेतली.
हेही वाचा – शहापूरमध्ये वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल
ट्राॅली मेमध्ये पूर्ण
मलंगगडावर जाणाऱ्या फ्युनिक्युलर ट्राॅलीचे काम मागील १५ वर्षांपासून रखडले आहे. या कामाचा ठेकेदार काम सोडून गेला. मुख्यमंत्री शिंदे यांनी या रखडलेल्या कामाची गंभीर दखल घेऊन हे काम मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.