जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३० जून पर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टी करण्यास देखील मज्जाव असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षविरोधात बंड पुकारल्याने राज्यभरात शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळे जिल्ह्यात कधीही शिंदे यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकक्षेतील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यस्था अबाधित राहावी याकरिता ३० जून पर्यंत पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असल्याचे आदेश काढले आहेत.

तसेच, या कालावधीत नागरिकांना शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदूका, सुरे, काठया, स्फोटक पदार्थ अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच गर्दी जमवून प्रचार करणे, व्यक्तिचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिकरितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे तसेच सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतेही भडकाऊ भाषणे देणे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक दर्शविणे यांसारख्या गोष्टी करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे