निसर्गऋण एनव्हायरमेंट संस्थेचा पुरतत्व विभागाकडे पाठपुरावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण- सातशे वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण मधील ऐतिहासिक काळा तलावाला संरक्षित पुरातत्व वास्तूचा दर्जा देण्यासाठी आवश्यक निकषांची तपासणी करुन अहवाल दाखल करण्याचे आदेश पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डाॅ. तेजस गर्ग यांनी रत्नागिरीच्या पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांना दिले आहेत. कल्याण मधील निसर्ग एनव्हारमेंट संस्था काळा तलावाला संरक्षित पुरातत्व वास्तूचा दर्जा मिळविण्यासाठी पुरातत्व विभागाकडे काही वर्षापासून प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांची दखल पुरातत्व विभागाने घेतली आहे.

ऐतिहासिक काळात कल्याण गाव हे एक बंदर होते. बोटी बनविणे, वखारीचे व्यवहार येथे चालायचे. या गावातील पाण्याची तहान भागविण्यासाठी या बंदरावर अंमल असलेल्या आदिलशहाने १५०६ मध्ये कल्याण गावाच्या मध्यवर्ति ठिकाणी दगडी बांधकाम करुन एक तलाव बांधला. या तलावाला सुस्थितीत करण्याचे काम १७६० मध्ये कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केले. या तलावातील पाणी खापरी नलिकांमधून पारनाका येथील सुभेदारवाडा, सरकारवाडा येथील पुष्करणीत सोडले जात होते. या पुष्करणीवर (लहान दगडी हौद) गावकरी, बंदरावरील व्यापारी, वखारवाले पाण्यासाठी यायचे. अशा या ऐतिहासिक वास्तुला संरक्षित पुरातत्व वास्तू म्हणून दर्जा द्यावा म्हणून कल्याण मधील निसर्ग पर्यावरण संस्थेचे दुर्वास चव्हाण काही वर्षापासून पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत आहेत.

काळा तलाव ही कल्याण मधील ऐतिहासिक वास्तू आणि संरक्षित पुरातत्व वास्तू आहे. या वास्तुला दर्जा देण्याची मागणीची दखल पुरातत्व विभागाने घेऊन काळा तलावाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी काळ तलावाची पाहणी करावी. विहित नमुन्यातील छायाचित्रे, नकाशाला पुरातत्व विभागाला सादर करवा आणि आवश्यक निकषांचा अहवाल दाखल करा, असे आदेश पुरातत्व विभागाने रत्नागिरीच्या पुरात्तव विभागाच्या साहाय्यक संचालकांना दिले आहेत.

काळा तलाव ही ऐतिहासिक पुरातत्व वास्तू असुनही तेथे कल्याण डोंबिवली पालिकेने स्मार्ट सिटी निधीतून तरंगती जेट्टी बांधण्याचे काम सुरू केल्याने कल्याणमधील नागरिक, निसर्ग पर्यावरण संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्व वास्तूच्या ठिकाणी कोणतेही नव्याने काम करण्यास परवानगी नसते. अशा परिस्थितीत काळा तलाव ही ऐतिहासिक वारसा यादीत नसल्याने हे काम सुरू असल्याचे पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. काळा तलाव हे कल्याणचे ऐतिहासिक वैभव असल्याने ते संरक्षित पुरातत्व वास्तू म्हणून जाहीर करावे अशी मागणी निसर्ग पर्यावरण संस्थेच्या चव्हाण यांनी पुरातत्व विभागाकडे चालू ठेवल्याने त्याची दखल घेण्यात आली आहे.

कल्याण शहराचा उल्लेख अनेक बखरी, ऐतिहासिक दस्तऐवज, विवेकानंद गोडबोले यांच्या ‘सुभे कल्याण’ पुस्तकात आहे. कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक श्रीनिवास साठे यांनीही इतिहासकालीन दस्तऐवजांचा आधार घेऊन या तलावावर लिखाण केले आहे. काळा तलावाला आता भगवा तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावाच्या काठी शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे. शरीर सुदृढतेसाठी पालिकेने याठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी काळा तलावावर नागरिकांची गर्दी असते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order submit report giving protected archeological status black lake of kalyan ysh
First published on: 15-10-2022 at 20:56 IST