ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने पोलिसांना दिले असून त्यासंबंधीचे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने काढले आहे.

 खंडणी उकळणे तसेच धमकावल्याप्रकरणी परमबीर यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात वॉरंट काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी म्हणजेच २०१८ मध्ये ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने एका प्रकरणात सोनू जालान आणि केतन तन्ना   यांना    अटक केली होती. त्यांच्याविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई  टाळण्यासाठी परमबीर  यांच्यासह २८ जणांनी त्यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा  आरोप झाला होता. याप्रकरणी तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.