कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत १४१ पैकी केवळ ६४ मंडळांचा उत्सव

कल्याण : करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नवरात्रोत्सवात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. शहरातील १४१ इतक्या सार्वजनिक मंडळांपैकी केवळ ६४ मंडळांकडून उत्सव साजरा करण्यात येत आहे.

शनिवारपासून नवरात्रोत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सवावर करोनाचे सावट आहे. नियमांच्या पालन करुन ठिकठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत  शहरातील १४१ इतक्या सार्वजनिक मंडळांपैकी के वळ ६४ मंडळांकडून उत्सव साजरा करण्यात येत आहे. तर उर्वरित ७७ मंडळांनी म्हणजेच निम्म्याहून अधिक मंडळांनी उत्सवातून माघार घेतल्याचे चित्र आहे. तसेच नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी व्यापारी, दात्यांकडून मिळणाऱ्या वर्गणी, देणग्यांचा ओघ आटल्यामुळेही काही मंडळांनी या वेळी उत्सव साजरा करण्यात हात आखडता घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

मागील वर्षी पालिकेच्या १० प्रभागांच्या हद्दीत १४१ नवरात्रोत्सव मंडळांनी उत्सव साजरा केला होता. या वेळी उत्सव साजरा करण्यासाठी ६६ मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले होते. त्यापैकी ६४ मंडळे उत्सव साजरा करण्यासाठी पुढे आली आहेत. पालिकेच्या परवानग्या घेऊन आणि करोना संसर्गाचे नियम पाळून हे उत्सव साजरे केले जात आहेत. तसेच साधेपणाने उत्सव साजरा करावा, अशा सूचना मंडळांना दिल्या आहेत, असे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी सांगितले.

कल्याण पश्चिमेतील ब प्रभागात गेल्या वर्षी १९ मंडळांनी नवरात्रोत्सव साजरा केला. या वर्षी या भागात चार मंडळे उत्सव साजरा करीत आहेत. अशीच परिस्थिती इतर प्रभागांत आहे. जे प्रभागात १८ पैकी ५, ड प्रभाग २० पैकी ६, ह प्रभाग ३० पैकी १८ मंडळे उत्सव साजरा करीत आहेत. आगामी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक नगरसेवक, होतकरू उमेदवार यांनी नवरात्रोत्सव काळात आपला प्रचार करण्याची आखणी केली होती. मात्र, करोना संसर्गाचे कठोर नियम असल्याने या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.