Pratap Sarnaik in Ovala Majiwada Vidhan Sabha Constituency : २००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत काही मतदारसंघांचं विभाजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये ठाण्यातील काही मतदारसंघांचही विभाजन झालं. हे विभाजन होऊन ओवळा माजिवडा हा मतदारसंघ निर्माण झाला. हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही प्रभाग समित्यांचाही यात समावेश आहे. २००९ सालापासून या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक जिंकून येत आहेत.
उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. कारण, गेल्या काही वर्षांत या विभागात झालेल्या विकासकामांमुळे ठाण्यातील सर्वांत मोठ्या वसाहती आणि सोसायट्या याच मतदारसंघात येतात. २००९ सालापासून आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा माजिवडा मतदारसंघ आपल्या काबूत ठेवला आहे. २०१४ मध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे येथील लढत चुरचीशी ठरली होती. या चुरशीच्या लढाईतही प्रताप सरनाईक यांनी बाजी मारली होती. प्रताप सरनाईक यांनी २०१४ ला भाजपाच्या संजय पांडे यांचा १० हजारांच्या फरकाने पराभव केला होता. २०१९ मध्ये युतीचे उमेदवार म्हणून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे विक्रांत भीमसेन त्यांच्याविरोधात होते. तेव्हाही प्रताप सरनाईक यांनी ८४ हजार मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती.
यावेळी परिस्थिती त्याहूनही वेगळी आहे. दोन पक्षांतील फूटीमुळे महायुतीतून प्रताप सरनाईक यांना संधी मिळाली तरी महाविकास आघाडीत ही जागा कोणत्या पक्षाकडे जातेय हे पाहावं लागेल. सध्या तरी राजकीय चर्चांनुसार ही जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात कोणत्या समस्या?
ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाची लोकवस्तीही या मतदारसंघात आहे. तर वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भागही याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात मोडतात. एका बाजूला टोलेजंग इमारती, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या बैठ्या चाळी येथे आहेत. तर, घोडबंदर रोड, भिवंडी बायपास, मुंबई नाशिक महामार्ग हेही याच मतदारसंघातून जातात. या रस्त्यांची दूरवस्था झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दिवसेंदिवस येथील लोकवस्ती वाढत असल्याने वाहतूक कोंडीचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे टोलेजंग इमारती असल्या तरीही येथे काही भागात पाण्याची मोठी समस्या आजही भेडसावते आहे. या सर्व बाबींवर यंदाचं मतदान होण्याची शक्यता आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मनसे लढत
महायुतीकडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने प्रताप सरनाईक यांना उमेदवारी दिली असून मनसेकडून संदीप पाचंगे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नरेश मणेरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि मनसे यांच्यात लढत होणार आहे.
स्टार प्रचारकांकडून प्रचारसभांचा धडाका
ओवळा माजिवडा मतदारसंघात तिन्ही उमेदवारांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांनी येथे प्रचारसभा घेतली. हा मतदारसंघ कट्टर शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.
ताजी अपडेट
हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. ठाणे जिल्ह्यात ५६.५ टक्के मतदान झालंय. हा मतदारसंघ हाय वोल्टेज असल्याने या मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे.
नवीन अपडेट
ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे प्रताप सरनाईक यांनी बाजी मारली आहे. त्यांना १ लाख ८४ हजार १७८ मते मिळाली असून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नरेश मनेरा त्यांच्याविरोधात लढत होते. त्यांना ७६ हजार २० मते मिळाली आहेत.
v