Overhead Wire Break : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने खोळंबा झाला आहे आणि ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना सोमवारी डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर पहिल्याच दिवशी खोळंबा

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागचं आहे. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई ट्रेन अपडेट्स या ग्रुपने ही माहिती दिली आहे. ओव्हरहेड वायर ( Overhead Wire ) तुटल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

प्रवासी चालत निघाले आणि रस्त्यावर आले

दुपारची वेळ असल्याने लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. ठाकुर्ली रेल्वे स्थानकापासून कचोरे गावदेवी मंदिरा दरम्यान लोकल बंद पडल्याने प्रवाशांनी चालत ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठले. तर काही प्रवाशांनी ९० फुटी रस्त्यावर जाऊन तेथून रिक्षेने कल्याणला जाण्याचा पर्याय निवडला. कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या मार्गात बदलापूर लोकल ओव्हरहेड तुटल्याने ( Overhead Wire ) खोळंबून राहिली होती. त्यामुळे या लोकलच्या पाठोपाठ धावणाऱ्या कल्याणकडे जाणाऱ्या कल्याण, टिटवाळा, कसारा, कसारा, अंबरनाथ, कर्जत, खोपोली लोकल ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा भागात जागोजागी खोळंबून राहिल्या. दिवा परिसरात कर्जतकडे जाणाऱ्या एक्सप्रेस खोळंबून राहिल्या.

ओव्हरहेड वायर तुटताना मोठा आवाज झाला

ओव्हरहेड वायर तुटताना मोठा आवाज आणि परिसरात धूर पसरला. केबल जळल्याचा वास सुटल्याने प्रवाशांना सुरूवातीला लोकलला आग लागल्याची जाणीव झाली. त्यामुळे घाईने प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. बदलापूर लोकलच्या ठाकुर्ली बाजूकडील तिसऱ्या डब्याजवळील ओव्हरहेड वायर ( Overhead Wire ) तुटली. मागील काही दिवसांपासून ठाकुर्ली जवळ लोकल, एक्सप्रेस इंजिन बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा- हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

ठाकुर्ली स्थानकावर झाली गर्दी

बदलापूर लोकल मधील प्रवासी, त्याच्या पाठोपाठ खोळंबलेल्या लोकलमधील गर्दी एकाचवेळी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात झाली. त्यामुळे हे स्थानक गर्दीने तुंडूब भरले होते. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घेत होते. रेल्वे मार्गातून पायी चालत येणाऱ्या प्रवाशांना जवान सुरक्षितपणे स्थानकाकडे येण्याच्या सूचना करत होते. ठाकुर्लीजवळ लोकल ( Overhead Wire ) बंद पडल्याची माहिती मिळताच डोंबिवली, ठाकुर्ली भागातील रिक्षा चालकांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात रिक्षा नेऊन प्रवाशांना आवश्यक ते भाडे घेऊन कल्याण, डोंबिवली परिसरात पोहचवले. ९० फुटी रस्त्यावरून कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती.