ठाणे : मुंबई नाशिक महामार्गालगतच्या पान-टपऱ्या आणि चायनिज खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी पान टपऱ्या, दुकानांत छापा टाकून गांजा हा अमली पदार्थ जप्त केल्याने टपऱ्यां, खाद्य पदार्थांच्या दुकाना आडून अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई नाशिक महामार्ग भिवंडी, ठाणे शहरातून जातो. या महामार्गालगत ठिकठिकाणी बेकायदा ढाबे, पान टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. परंतु या आस्थापनांवर प्रशासनाकडून कारवाई होत नाही. गेल्या काही दिवसांपासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार, ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डाॅ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी वेगवेगळी पथके तैनात केली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई नाशिक महामार्गालगतच्या टपऱ्यांवर गांजा हा अमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती भिवंडी तालुका पोलिसांच्या पथकाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे, भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कदम यांच्या पथकाने मुंबई नाशिक महामार्गावरील येवई भागातील लाला पान शाॅप या पान-टपरीवर आणि साईनाथ चायनिज या खाद्य पदार्थाच्या दुकानात छापा टाकला. त्यावेळी लाला पान शाॅपमधील राकेश साहू आणि साईनाथ चायनिज खाद्य पदार्थाच्या दुकानातील ब्रिजेश यादव, सुरज पासवान यांच्याकडे गांजा हा अमली पदार्थ आढळून आला. २ किलो ९७९ ग्रॅम वजनाचा आणि ५९ हजार ५८० रुपये किमतीचा हा गांजा आहे. तसेच त्यांच्याकडे ३ लाख ११ हजार ९५० रुपयांची रोकड आढळून आली. हा गांजा विक्री करण्यासाठी त्यांनी बाळगला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.