ठाणे – आजच्या तरुण पिढीचा संगीत साधनेपेक्षा रियालिटी शोज मध्ये सहभागी होऊन लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवण्याकडे कल असल्याची चिंता पद्मश्री डॉ. सोमा घोष यांनी व्यक्त केली. तसेच कलाकार हे दीर्घकाळ संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी दररोज आवश्यक असलेला रियाज करत नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात डॉ. वा.ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे ४६ वे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मश्री डॉ. सोमा घोष यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रा. मनीषा ठाकूर यांनी डॉ. सोमा घोष यांची जाहीर मुलाखत घेताना त्यांना त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलते केले. आजच्या आधुनिक संगीताबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत आजकालच्या गाण्यातील शब्द व त्याचे अर्थ याबद्दल आजच्या तरुण पिढीने अशा प्रकारच्या गाण्यांना विरोध करावा असे सुचवले. कलेसाठी कोणतीही तडजोड करू नका तर कलेसाठी साधना करा, तपस्या करा असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुचित्रा नाईक यांनी विद्यार्थ्यांनी भारतीय मूल्य परंपरांना अंगीकारले पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान डॉ. सोमा घोष यांनी गझल, ठुमरी गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.