मराठी नाविक सामर्थ्यांचे दर्शन घडवणारे ‘जलाढय़’

या चित्रांचे ‘जलाढय़’ हे प्रदर्शन शनिवार २१ ते २३ मेदरम्यान ठाणे कला भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

चित्रकार सचिन सावंत यांच्या चित्रांचे ठाण्यात प्रदर्शन

कोकण किनारपट्टीच्या भौगोलिक परिस्थितीचा सुयोग्य वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्यावर समुद्रातून होणारे हल्ले रोखण्यासाठी कोळी बांधवांच्या मदतीने महाराजांनी मराठी आरमाराची संरक्षण फळी समुद्रात उभी केली. कल्याण बंदरामध्ये नौकाबांधणीच्या कार्याला सुरुवात झाल्यापासून ते मराठय़ांचे शेवटचे आरमार प्रमुख तुळाजी आंग्रे यांच्या झालेल्या पराभवापर्यंतचा काळ चित्रकार सचिन सावंत यांनी कुंचल्याच्या साहाय्याने चित्रित केला आहे. मराठा आरमाराचे सामथ्र्य, त्यांच्या मोहिमा, युद्धाचे प्रसंग आणि शेवटचा पराभव या सगळ्यांचे दर्शन या चित्रांमधून साकारण्यात आले आहे. त्यांच्या या चित्रांचे ‘जलाढय़’ हे प्रदर्शन शनिवार २१ ते २३ मेदरम्यान ठाणे कला भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.

मूळचे कोकणातील देवरूख येथील असलेल्या सचिन सावंत यांनी मराठय़ांच्या आरमाराचा इतिहास चित्ररूपाने जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या वेळी त्यामध्ये असलेल्या अडचणी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. मराठय़ांच्या इतिहासाची आणि युद्धाची अनेक वर्णने आपल्याला वाचायला मिळतात, मात्र त्यांच्याविषयीचे दृश्य माध्यमातील चित्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मराठय़ांचे पहिले जहाज, युद्ध प्रसंग, त्यांचा वेश कसा असेल याविषयी कुतूहल त्यांच्यामध्ये जागृत होऊन त्यांनी या विषयाचे संशोधन सुरू केले. त्या वेळी इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याकडील ऐतिहासिक साहित्यामध्ये तशी चित्रे असल्याची माहिती सावंत यांना मिळाली आणि त्यांनी ती मिळवून चित्रे काढण्यास सुरुवात केली. सुमारे तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर २० चित्रांचा एक समूह तयार करण्यात आला असून त्याचे पहिले प्रदर्शन ठाण्यातील कलादालनामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

कल्याणमधील  मराठा आरमाराची स्थापना, शिवाजी महाराजांनी कारवापर्यंत केलेला जलप्रवास ‘बसरूडची मोहीम’, सुवर्णदुर्गावरील कान्होजी आंग्रे यांचा सिद्दीबरोबरचा संघर्ष आणि कान्होजी आंग्रे यांचे पहिले व्यक्तिचित्र या प्रदर्शनातून रसिकांना पाहता येणार आहे.   कल्याणपासून सुरू झालेले आरमार केंद्र अंजनवेल, रत्नागिरी असे विस्तारत गेले. या सगळ्याचे दर्शन या प्रदर्शनातून होणार आहे. कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे यांचे मार्गदर्शनसुद्धा या उपक्रमाला लाभले असून तेही या वेळी रसिकांशी संवाद साधणार आहेत.

‘जलाढय़’ प्रदर्शन

ठाण्यातील माजिवडा येथील समतानगर, जुना आग्रा महामार्गारील ठाणे कला भवनमध्ये हे प्रदर्शन २१ ते २३ मेदरम्यान सुरू असेल. २१ मे रोजी भारतीय नौसेनेचे व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे, तर २१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता सरखेल रघुजीराजे आंग्रे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Painter sachin sawant pictures display in thane

ताज्या बातम्या