कल्याण – आमच्याकडे २० अमेरिकन डाॅलरच्या ५०० नोटा आहेत. त्या नोटा आम्ही तुम्हाला देतो. त्या बदल्यात तुम्ही आम्हाला २ लाख रूपये द्या, असे सांगून कळंबोलीतील तीन भामट्यांनी पलावातील व्यावसायिकाला डाॅलरच्या बदल्यात डाॅलर नोटांच्या आकाराच्या रद्दी नोटा दिल्या. आणि २ लाख रूपये व्यावसायिकाकडून उकळून पळ काढला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित गौतम (३५) असे तक्रारदार व्यावसायिकाचे नाव आहे. ते शिळफाटा रस्त्यावरील डाऊन टाऊन लोधा पलावा भागात राहतात. ते महापे औद्योगिक क्षेत्रात कामगार पुरविण्याचे काम करतात. गेल्या १५ दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेत तक्रारदार रोहित गौतम लोधा पलावा भागातील तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

तलावाच्या काठी बसले असताना शफीकुल शेख नावाचा ४० वर्षाचा इसम त्यांच्याजवळ आला. दोघांच्यात गप्पा सुरू झाल्या. त्याने मी कळंबोली येथे राहतो. तेथे फळ विक्रीचा व्यवसाय करतो असे रोहित यांना सांगितले. गप्पा सुरू असताना शफीकुल याने स्वताच्या खिशातून २० अमेरिकन डाॅलरची नोट बाहेर काढली. ती रोहित यांना दाखवली. कळंबोली येथील आपल्या खाला नावाच्या नातेवाईक महिलेकडे अशाप्रकारच्या ५०० नोटा आहेत. तिला रोख रक्कम दिली तर ती त्या नोटा देण्यास तयार आहे. या बदल्यात मला पंधरा हजार रूपये कमिशन मिळेल असे शफीकुल याने तक्रारदाराला सांगितले.

रात्र झाल्याने रोहित घरी आले. त्यानंतर शफीकुल शेख याने रोहित यांना संपर्क करून दुसऱ्या दिवशी कळंबोलीतील सिटी रुग्णालय येथे बोलावले. तेथे तक्रारदार गेले. तेथे नोटा ताब्यात असलेल्या खाला महिलेचा मुलगा आणि तिचा भाचा २० डाॅलरच्या नोटा घेऊन आले होते. मुलाने रोहित यांना चोरून पिशवीतील एक नोट दाखवली. ती तपासून घेण्यासाठी ताब्यात दिली.

खाला बाहेर गेल्याने ती येऊ शकली नाही असे कारण देण्यात आले. तक्रारदार ताब्यात मिळालेली २० डाॅलरची नोट घेऊन पनवेल येथे ती खरी आहे का आणि परिवर्तन करण्यासाठी घेऊन गेले. तेथे परकीय नोट परिवर्तन केंद्रात तक्रारदारला त्या नोटेच्या बदल्यात १ हजार ७१० रूपये मिळाले. त्यामुळे या इसमांकडे असलेल्या नोटा खऱ्या आहेत याची खात्री तक्रारदाराची पटली.

मध्यस्थ रफिक इसमाने रोहित यांना संपर्क करून नोटांची ताबेदार महिला खाला ५०० नोटांच्या बदल्यात ३ लाख रूपये मागत असल्याचे कळविले. तक्रारदाराने आपण फक्त दोन लाख रूपये देऊ शकतो असे सांगितले. शफीकुलच्या सांगण्याप्रमाणे व्यवहार अंतीम करण्यासाठी तक्रारदार राहुल गौतम आणि त्यांचा मित्र राहुल विश्वकर्मा कळंबोली सिटी रुग्णालय परिसर येथे २० डाॅलरच्या ५०० नोटा ताब्यात घेणे आणि त्या बदल्यात दोन लाख रूपये खाला महिलेला देण्यासाठी मोटारीने गेले.

तेथे शफीकुल खालाचा मुलगा आणि अन्य एक इसम होता. त्यांनी २० अमेरिकन डाॅलरच्या नोटा असलेली बंदिस्त पिशवी मला दिली. त्या बदल्यात दोन लाख रूपयांची रक्कम मी त्यांना दिली. व्यवहार पूर्ण झाल्यावर रोहित आपल्या वाहनात येऊन बसला. शफीकुल आणि अन्य दोन जण तेथून तात्काळ निघून गेले. रोहित वाहनात बसून बंदिस्त पिशवीत रुमालात गुंडाळलेल्या किती नोटा आहे ते तपासू लागले. त्यावेळी त्यांना युएस डाॅलरची एक नोट नोटांच्या आकाराच्या रद्दी कागदांना चिकटवलेली दिसली. त्यामध्ये एक कपडे धुण्याचा साबण होता. तिन्ही इसमांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच रोहित गौतम यांनी परिसरात भामट्यांचा शोध घेतला ते आढळले नाहीत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी रोहित यांनी तक्रार केली आहे.