विशेष अ‍ॅपची निर्मिती; पोलिसांच्या कामावर अधीक्षकांची नजर

पोलीस ठाण्यात नागरिकांना आपल्या कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागतात. रिकाम्या हाताने परतावे लागते, शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाला सामोरे जावे लागते. मात्र पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी विशेष अ‍ॅप तयार केले असून आलेल्या प्रत्येक अभ्यागताची नोंद या अ‍ॅपमध्ये केली जाणार आहे. त्याची माहिती मुख्यालयातील पोलीस अधीक्षकांना मिळणार आहे.

पालघर जिल्ह्यातील पोलिसांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी ‘थर्ड आय’ नावाचे अ‍ॅप पोलिसांच्या भ्रमणध्वनीत टाकले आहे. यामुळे पोलिसांच्या प्रत्येक हालचाली नोंदवल्या जात असून त्याची माहिती अधीक्षकांना मिळत आहे. त्याच्या पुढे जाऊन आता नागरिकांच्या सोयीसाठी ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ अर्थात अभ्यागत व्यवस्थापन यंत्रणा ही कार्यप्रणाली विकसित केली आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताची (व्हिजिटर्स) नोंद या अ‍ॅपमध्ये केली जाणार आहे. ही नोंद होताच तात्काळ त्या अभ्यागताच्या भ्रमणध्वनीवर एक ऑनलाइन पावती येईल. त्यात एक फिडबॅक अर्जही (प्रतिसाद अर्ज) असेल. अभ्यागतांना पोलीस ठाण्यात कशी वागणूक मिळाली, कर्मचारी कसे वागले, कामावर समाधान आहे का त्याची माहिती या फिडबॅकद्वारे देता येणार आहे. हे अ‍ॅप मुख्यालयातील अधीक्षकांच्या संगणकाशी जोडले आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अभ्यागत आले ते त्यांना समजणार आहे.  पोलीस ठाण्यात किती तक्रारदार आले याच्या नियोजनाबरोबर ही यंत्रणा अनेक  दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.

ही यंत्रणा आम्ही जिल्ह्याच्या २३ पोलीस ठाणी आणि इतर शाखेत कार्यान्वित केली आहे. मला प्रत्येक पोलीस ठाण्यात किती अभ्यागत आलेले आहेत त्याची माहिती मिळते. या अभ्यागतांची नोंद असल्याने आम्ही त्यांच्याकडे चौकशी करून कामासंदर्भात विचारणा करू शकतो. एखादी व्यक्ती वारंवार पोलीस ठाण्यात आली तर त्याचे नाव या यंत्रणेत दिसेल. पोलीस अधीक्षक कार्यालयातून संबंधित व्यक्तीला विचारणा केली जाईल आणि त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला त्याबाबत विचारणा केली जाईल.

मंजुनाथ सिंगे, पोलीस अधीक्षक, पालघर

यंत्रणेचे फायदे

’  पोलीस ठाण्यात वावर असलेल्या दलालांना विळखा

’ वारंवार लोकांना कामासाठी फेऱ्या माराव्या लागल्या तर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला जाब विचारणार.

’ अभ्यागतांना पोलीस ठाण्यात कसा अनुभव आला ते सांगता येणार.

’ अभ्यागताने दिलेल्या प्रतिसादानंतर कार्यपद्धतीत बदल केले जाणार.

’ अभ्यागतांना पोलीस ठाण्यात कसा अनुभव आला ते सांगता येणार.

’ कामचुकार पोलिसांना आळा.

’ दररोज किती लोक येतात, का येतात, कुठल्या तक्रारी घेऊन येतात याची माहिती साठवता येणार आहे.