लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटामुळे नुकसान झालेल्या एक ते दोन किलोमीटर परिसरातील कंपन्या, हॉटेल्स, इमारती, घरे अशा एकूण ९४१ मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळे यांनी दिली.

अनेक मृतदेहांची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या माध्यमातून बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नुमने घेऊन ते फोरेन्सिक प्रयोगशाळा आणि डीएनए चाचणीसाठी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या बेपत्ता कामगाराची अद्याप ओळख पटत नसल्याने आणि त्याचा शोध लागत नसल्याने अनेक कामगार कुटुंबीय शोकाकूल आहेत. आमच्या कामगारांचा शोध लावून द्या, असा दबाव या कुटुंबीयांकडून तपास यंत्रणांवर वाढत आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात दहावीचा ९५.५६ टक्के निकाल, ९६. ७९ मुली तर, ९४.३९ टक्के मुल उत्तीर्ण

तज्ज्ञांचा सहभाग

अमुदान स्फोट प्रकरण तपासात कोणतेही कच्चे दुवे राहू नयेत म्हणून रासायनिक तज्ज्ञ आणि कंपनीशी संबंधित इतर तज्ज्ञांचे सहभाग आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. याशिवाय फोरेन्सिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयातील अधिकारी यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. सबळ पुरावे या प्रकरणात आरोपींविरुध्द गोळा करून हे प्रकरण न्यायालयात सादर करण्यापूर्वी भक्कम केले जात आहे. कंपनी स्थळावरून विविध प्रकारचे रासायनिक आणि अन्य नमुने गोळा केले जात आहेत, असे या प्रकरणातील तपास अधिकारी उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अशोक कोळी यांनी सांगितले.

या स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मलय मेहता याच्या घरातून कंपनी, उत्पादन निगडित काही महत्वाची कागदपत्रे तपास पथकाने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांचे आधारे, परवाने, नुतनीकरण आणि त्याप्रमाणे कंपनीतील उत्पादन प्रक्रिया सुरू होती का हे तपासले जाणार आहे. या कंपनीतील बाष्पकला परवानगी नसल्याचे बाष्पक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या अनुषंगाने तपास केला जाणार आहे, असे कोळी यांनी सांगितले.

आणखी वाचा-ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद

अमुदान आणि लगतच्या सप्तवर्ण, कॉसमॉस केमिकल कंपनीतील एकूण नऊ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. बचाव कार्य करताना कामगारांचे विविध अवशेष सापडतात. ते एकत्रित करून शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात येतात, असे पालिका अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.

मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आठ कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय स्फोटातील मृतदेहांच्या विविध अवेशषांचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कलिना येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांनी दिली. आतापर्यंत १८ विविध प्रकारचे नमुने फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जसे विविध अवयव बचाव पथकाकडून रुग्णालयात येतात. त्याप्रमाणे ते नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले जातात, असे डॉ. रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले.

अमुदान कंपनी स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकूण २५ तलाठी नेमण्यात आले होते. कंपनी परिसरातील नुकसान झालेल्या मालमत्ता, आस्थापना यांचे एकूण ९४१ पंचनामे करण्यात आले आहेत. -सचिन शेजाळे, तहसीलदार, कल्याण.