ठाणे – पर्यावरण आणि संस्कृतीत फुलांना महत्त्वाचे स्थान आहे. फुले परागीभवनास मदत करून वनस्पतींच्या पुनरुत्पादनात हातभार लावतात. परंतू, आजकाळ प्लास्टिक फुलांचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला असून हा वापर कमी व्हावा तसेच प्लास्टीक फुलांना पर्यायी म्हणून कागदी फुलांचा वापर करता येतो. परंतू, अनेकांना हे माहित नाही.

तसेच कागदी फुलांची निर्मीती कशी करावी हे देखील ज्ञात नसते. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना कागदी फुले तयार करता यावी याकरिता वनशक्ती या संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कागदी फुल निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वनशक्ती संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा, सरळांबे,शहापूर, ठाणे येथे मोफत कागदी फुलनिर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एकूण ५० विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यशाळेमध्ये वनशक्तीच्या प्रकल्प अधिकारी आणि वनस्पती अभ्यासक चित्रा म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी चित्रा म्हस्के यांनी फुलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. फुलांमुळे जैवविविधतेचे संतुलन टिकून राहते. तसेच मधमाशा, फुलपाखरे आणि पक्ष्यांसारख्या अनेक जीवांना अन्नस्रोत मिळतो. फुलांचा वापर सौंदर्यप्रसाधने, औषधनिर्मिती , रंग तयार करणे, अत्तर बनवणे यासाठी देखील केला जातो, अशी माहिती चित्रा म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना दिली.

त्यापुढे म्हणाल्या,भारतीय संस्कृतीत फुलांना पवित्र स्थान आहे. पूजा-अर्चा, सण-उत्सव, विवाहसोहळे आणि विविध धार्मिक विधींमध्ये फुलांचा वापर शुभ मानला जातो. त्यामुळे फुले ही फक्त सौंदर्याचे प्रतीक नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जडणघडीतला एक अविभाज्य घटक आहेत. परंतु, आजच्या काळात प्लास्टिक फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. यासाठी पर्याय म्हणून कागदी फुले ही पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येणारी कलात्मक संकल्पना आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अस्टर, जास्वंद, चाफा, पारिजातक, गुलाब, ग्लॅडिओलस (तलवार लिली), लॅव्हेंडर आणि डेलिया अशी विविध रंगीत फुले कागदातून बनवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणाबद्दलची जागरूकता आणि पुनर्वापराच्या संकल्पनेबद्दलची जागरूकता वाढली असे मुख्याध्यापक शंकर सातपुते यांनी यावेळी सांगितले.