कलानी कुटुंबीयांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; २१ नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेसह भाजपला धक्का

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा केला होता.

ठाणे : उल्हासनगरातील राजकारणात दबदबा असलेल्या कलानी कुटुंबीयांना पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप आणि त्यानंतर सेनेला साथ देऊन महत्त्वाची पदे पदरात पाडून घेणाऱ्या कलानी कुटुंबीयांसह २१ नगरसेवकांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणखी दहा नगरसेवक लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगत आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच पप्पू कलानीची कन्या सीमा कलानी यांनीही  राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान खुनाचा गुन्हा दाखल असलेला आणि सध्या पेरॉलवर बाहेर असलेल्या पप्पू कलानीची पाटील यांनी भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी पप्पूची भेट घेत भाजप प्रवेश करावा असे आमंत्रण उल्हासनगरातील भाजप आमदार कुमार आयलानी यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू आणि ओमी कलानी यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पप्पू यांची सून आणि उल्हासनगरच्या माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह २१ नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला. 

उल्हासनगरमध्ये सत्तेचा दावा

कलानी कुटुंबीयांना कसा त्रास दिला गेला आणि त्यांना पक्षप्रवेश करण्यास भाग पाडले, ही सर्व गोष्ट स्वर्गीय ज्योती कलानी यांनी त्या वेळेस मला सांगितली होती. त्यावर आता चर्चा करण्याची नाही. तसेच ते कलानी आहेत, ते कुणाला घाबरत नाहीत, असे सांगत नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा दावा मंत्री आव्हाड यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pappu kalani family joins ncp zws

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या