ठाणे : उल्हासनगरातील राजकारणात दबदबा असलेल्या कलानी कुटुंबीयांना पक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप आणि त्यानंतर सेनेला साथ देऊन महत्त्वाची पदे पदरात पाडून घेणाऱ्या कलानी कुटुंबीयांसह २१ नगरसेवकांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणखी दहा नगरसेवक लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगत आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा दावा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच पप्पू कलानीची कन्या सीमा कलानी यांनीही  राष्ट्रवादीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान खुनाचा गुन्हा दाखल असलेला आणि सध्या पेरॉलवर बाहेर असलेल्या पप्पू कलानीची पाटील यांनी भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी पप्पूची भेट घेत भाजप प्रवेश करावा असे आमंत्रण उल्हासनगरातील भाजप आमदार कुमार आयलानी यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू आणि ओमी कलानी यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. दरम्यान, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी बुधवारी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पप्पू यांची सून आणि उल्हासनगरच्या माजी महापौर पंचम कलानी यांच्यासह २१ नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला. 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pappu kalani family joins ncp zws
First published on: 28-10-2021 at 03:11 IST