ठाणे – मध्य रेल्वेवरील लोकल वाहतुकीत तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि स्थानकांवर वाढणारी प्रवाशांची गर्दी यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. अशा वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेली आणि उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर न होणारी ‘रेल्वे वर्कमन स्पेशल’ लोकल मधील काही डबे सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे केली आहे. केली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यास स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढते आणि प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी ताटकळत राहावे लागते. अशा परिस्थितीत परळ ते कल्याणदरम्यान धावणारी रेल्वे वर्कमन स्पेशल लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा पुढे आला आहे. मध्य रेल्वेतर्फे दररोज दुपारी सुमारे ४.०५ वाजता परळ स्थानकातून कल्याणच्या दिशेने रेल्वे वर्कमन स्पेशल लोकल चालवली जाते. ही गाडी प्रामुख्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी राखीव असते. मात्र, या लोकलमधील उपलब्ध जागांचा पुरेपूर वापर होत नसल्याने गर्दीच्या काळात तिचा उपयोग सर्वसामान्य प्रवाशांनाही होऊ शकतो, असे म्हस्के यांनी पत्रात सांगितले आहे. सिग्नल बिघाडाच्या वेळी प्रवाशांची गैरसोय
२६ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी रेल्वे वर्कमन स्पेशल लोकल धावत असतानाही तिचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश करता आला नाही, असा मुद्दा म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.
…तर प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळू शकेल
रेल्वे ही मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रमुख आधार आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाड किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध रेल्वे सुविधांचा जनहितासाठी वापर करणे आवश्यक आहे. वर्कमन स्पेशलमधील काही डबे सर्वसामान्य प्रवासी, महिला आणि दिव्यांगांसाठी उपलब्ध केल्यास अशा परिस्थितीत प्रवाशांना अतिरिक्त पर्याय मिळू शकतो. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांशी सुसंवाद राखण्याच्या आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही म्हस्के यांनी केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक आदेश द्यावेत, असे आवाहन त्यांनी रेल्वे प्रशासनाला केले आहे.
