वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने काही पालकांची लाखो रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात मेरीट ब्यू इंडिया प्रा. लिमी. या कंपनीचे करणसिंग भदोरीया, शोभा राठोड आणि रजनीश पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक २२ परिसरात ब्यू इंडिया प्रा. लिमीटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळवून देतो असे सांगणयात येत होते. त्यामुळे अनेक पालकांनी या कंपनीच्या करणसिंग, शोभा राठोड आणि रजनीश यांच्याकडे वैद्यकीय महाविद्यालच्या प्रवेशासाठी प्रत्येकी सुमारे ३ लाख रुपये भरले होते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून करणसिंग, शोभा आणि रजनिश यांचे फोन बंद येत असून कंपनीलाही कूलूप लागलेले आहे. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही पालकांनी याप्रकरणी फसवणूकीची तक्रार श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.